Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Gulabrao patil : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गुलाबराव पाटील यांची जळगावात सभा पार पडली. या सभेत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
जळगाव : अंबे दार उघड आणि आमच्या विरोधात जे बोलत आहेत व गोरगरिबांना जे हिनवत आहेत त्यांचा सत्यानाश कर, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने गुलाबराव पाटील यांची जळगावात (Jalgaon News) सभा पार पडली. या सभेत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) रक्कम दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गुलाबराव पाटील म्हणाले की, कुणी कितीही लालूच दिली तरी माणसं बेमान होतील. मात्र, आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाहीत. गुलाबराव पाटील व एकनाथ शिंदे यांचे सरकार पुन्हा लाडक्या बहिणी निवडून देणार आहे. पुन्हा जर आमचं सरकार आलं तर दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
विरोधकांचा सत्यानाश कर
अंबे दार उघड आणि आमच्या विरोधात जे बोलत आहेत व गोरगरिबांना जे हिनवत आहेत त्यांचा सत्यानाश कर. जीवन छोटसं आहे गुलाबराव पाटील आज बोलतो उद्या चालला जाईल. मात्र, तुमचं काम करून गेलो तर तुम्ही कायम लक्षात ठेवाल. आज जे काही बोलतो आहे ते सर्व बहिणींच्या आशीर्वादानेच बोलत आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
चांगलं कामाला वाईट म्हणणं हाच विरोधकांचा धंदा
ते पुढे म्हणाले की, मी लोकांना पंढरपूरला नेलं. तुम्ही कमीत कमी वणी गडावर किंवा मनुदेवीच्या मंदिरावर तरी न्या. नुसतं भाषण करून चालत नाही तर करून दाखवावं लागतं. स्वतःला पोरगं झालं ते चांगलं आणि दुसऱ्याला पोरगं झालं ते काळं नकट अशा पद्धतीचा विरोधकांचा विचार आहे. प्रत्येक गावात रावण अजून जिवंत आहे ते मेलेले नाही. जिथे चांगलं काम होतं त्या कामाला वाईट म्हणणं हाच विरोधकांचा धंदा असल्याचा हल्लाबोल देखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
आणखी वाचा
जळगावात दोन गुलाबरावांच्या लढतीत कोणाला सर्वाधिक काटे टोचणार? देवकरांनी आव्हान देताच चर्चा रंगली