Jalgaon Loksabha : जळगावात ठाकरे गटाची मोठी खेळी, स्मिता वाघ यांच्याविरोधात भाजपच्याच नेत्याला रिंगणात उतरवणार?
Lok Sabha Election 2024 : जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. स्मिता वाघ यांच्या विरोधात भाजपच्याच नेत्याला तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभा मतदार संघात (Jalgaon Lok Sabha Constituency) गेल्या 30 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा (BJP) वरचष्मा राहिला आहे. भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांची उमेदवारी नाकारून माजी आमदार स्मिता वाघ (Smita Wagh) यांना भाजपकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगावात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.
ही जागा शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) सुटणार असल्याने स्मिता वाघ यांच्या विरोधात नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असताना सध्या भाजपत असलेले पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. करण पवार यांना ठाकरे गटाने आपल्याकडे घेवून उमेदवारी दिल्यास जळगाव लोकसभा मतदार संघात ठाकरे गट विरुद्ध भाजपची चुरशीची लढत होणार, अशी चर्चा आहे.
जळगावात ठाकरे गटाकडे वाढली इच्छुकांची संख्या
जळगावात ठाकरे गटाकडून प्रथम माजी महापौर कुलभूषण पाटील, भाजपतून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अमळनेर येथील ललीता पाटील इच्छुक होत्या. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारलेले विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील, चाळीसगाव येथील उत्तमराव महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरद पवार गटाचे प्रमोद पाटीलही मशाल घेवून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदरीतच ठाकरे गटाकडे इच्छुकांची संख्या वाढल्याचे दिसून येते.
करण पवार ठरणार प्रबळ उमेदवार?
आता भाजपचे युवा पदाधिकारी व पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची चर्चा आहे. करण पवार हे प्रबळ उमेदवार ठरू शकतील. लोकसभा मतदार संघातील लढतीचे गणित बदलवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता ठाकरे गटाकडून स्मिता वाघ यांच्या विरोधात नक्की कुणाला उमेदवारी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
करण पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
दरम्यान, करण पवार हे सध्या मुंबईत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते. पवारांनी त्यांच्या उमेदवारीला सकात्मकता दर्शविली असल्याची माहिती मिळत आहे. हा मतदार संघ ठाकरे गटाकडे असल्याने त्यांच्याकडून उमेदवारीबाबत करण पवार यांनी निर्णय घ्यावा असे सूचविले आहे.
आणखी वाचा