'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Anil Deshmukh on Devendra Fadnavis : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Anil Deshmukh जळगाव : केंद्र आणि राज्य सरकार सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत. आपल्यामधील जे काही लोक सोडून गेले ते ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) धाकाने तिकडे गेले आहेत. माझ्यावर कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप आणि गुन्हे दाखल करण्यात आले होते. आपल्यावरील ईडी आणि सीबीआयची कारवाई टाळायची असेल तर तुम्ही शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर ते सांगतील तशा पद्धतीचे आरोप करण्याचे मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या माध्यमातून सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.
अनिल देशमुख म्हणाले की, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर एका गाडीत बॉम्ब ठेवण्यात आले होते. गृहमंत्री म्हणून चौकशी करत असताना या बॉम्बठेवण्याच्या प्रक्रियेत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि त्यांचे सहकारी सहभागी असल्याची माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्यांना बदली करून बाजूला केले होते. त्यांच्या बदलीनंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला हाताशी धरून माझ्यावर शंभर कोटींचा आरोप करण्यात आला होता. मात्र शेवटी त्यात तथ्य दिसून न आल्याने आपण सुटलो, असे त्यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुखांच्या आरोपाने खळबळ
चौदा महिने मला जेलमध्ये काढावे लागले, माझ्यावर आरोप लावल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या माणसांना आपल्याकडे पाठवले आणि तुम्ही दोषी नाहीत हे आम्हाला माहीत आहे. आम्ही तुम्हाला मदत करतो, असे त्यांनी त्यांच्या माणसाच्या माध्यमातून मला सांगितले. काही कागदपत्र असलेले पाकीट मला पाठवले. त्या कागदांवर मी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर काय आरोप लावायचे हे सांगितले होते. हे आरोप केले तर तुम्हाला ईडी किंवा सीबीआयच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले. मी जेलमध्ये जाईल, मात्र अशा प्रकारचे कृत्य आपण कधीही करणार नाही, असे मी त्यांना सांगितल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी जाहीर सभेत केला आहे. अनिल देशमुख यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता देवेंद्र फडणवीस यावर काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार, अनिल देशमुखांचा जोरदार हल्लाबोल