97th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: अमळनेरमध्ये भरणार साहित्यिकांचा मेळा! 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात
97th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आजपासून या साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात होत आहे.
जळगाव : 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (97th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) 2 फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर, जळगावमध्ये (Jalgaon) सुरू होत आहे. त्यासाठी साहित्यिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी साहित्यिकांसह दिग्गज मंत्री सुद्धा या साहित्य संमेलनास हजेरी लावणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या साहित्य संमेलनकडे लागले आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. साहित्य संमेलनामुळे सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
1952 साली साहित्य संमेलन झाल्यानंतर अमळनेरात पुन्हा एकदा 72 वर्षांनी हे संमेलन 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. साहित्य संमेलनासाठी साने गुरुजी साहित्य नगरीत तीन सभामंडप उभारण्यात आलेत. यातील सभामंडप क्रमांक एकमध्ये उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. यासाठी वाडी संस्थानपासून सकाळी 7.30 वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होणार आहे.
सभामंडप क्रमांक 1 मधील कार्यक्रम
2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रा.उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन होईल. सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी असतील. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन संमेलनाचे उद्घाटन करतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दुपारी 2 वाजता बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाईल. बालमेळाव्याचे समन्वयक एकनाथ आव्हाड मनोगत व्यक्त करतील. दुपारी 3.30 वाजता राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद होईल. अमरावतीचे डॉ. मनोज तायडे अध्यक्षस्थानी असतील. यात मुंबईचे ॲड.धनराज वंजारी, लातूरचे डॉ. ज्ञानदेव राऊत, वाळवा येथील दि.बा. पाटील, बिदर येथील इंदुमती सुतार, धरणगाव येथील प्रा.चत्रभूज पाटील सहभागी होतील. सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रभाकर ज.जोशी करतील. सायंकाळी 5.30 वाजता कविसंमेलन होईल. रात्री 8.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतील
सभामंडप क्रमांक 2 मधील कार्यक्रम
फेब्रुवारी 2 रोजी दुपारी 2 वाजता परिसंवाद होईल. ‘कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक' या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे प्रा.अविनाश कोल्हे असतील. दुपारी 3.30 वाजता ‘सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक आणि सामाजिक योगदान' या विषयावर परिसंवाद होईल. छत्रपती संभाजीनगरचे बाबा भांड अध्यक्षस्थानी असतील. यात पुणे येथील डॉ.केशव तुपे आणि अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रमेश माने सहभागी होतील. दुपारी 4.30 वाजता ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान' या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी 5.30 वाजता स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान' या विषयावर परिसंवाद होणार आहे.
सभामंडप क्रमांक 3 मधील कार्यक्रम
2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कविकट्टा कार्यक्रम होईल. राजन लाखे आणि सहकारी या कविकट्ट्याचे संयोजक आहेत.
संमेलनास उपस्थिती राहण्याचे आवाहन
तीन दिवस होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, सोमनाथ ब्रह्मे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल यांनी केले आहे.
ही बातमी वाचा :