धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक तीन समोरील एका चहा स्टॉलवर गॅस शेगडीजवळ ठेवलेल्या लायटरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.
पुणे : धूम्रपान करण्यासाठी विशेषतः सिगारेट ओढण्यासाठी सध्या लायटर्सचा सर्रास वापर केला जातो. पुण्यासारख्या शहरात हा वापर सहजतेने केला जातो. त्यामुळेच पान टपरी असो किंवा चहा-नाश्त्याचा गाडा लायटरचा (Lighter) वापर अनेकदा गॅस पेटवण्यासाठी देखील केला जातो. मात्र, हाच प्रकार अंगलट आल्याने एका चहा स्टॉलवालवर स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यास गंभीर दुखापत झाली असून पुण्यातील (Pune) शिवाजी नगर परिसरात हा अपघात घडला.
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक तीन समोरील एका चहा स्टॉलवर गॅस शेगडीजवळ ठेवलेल्या लायटरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. येथील गॅस शेगडीवर ठेवलेला लायटर गरम होऊन त्याचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. येथील वडापावच्या गाडीवर दुपारी कर्मचारी जेवायला आले असता ही घटना घडली. त्यावेळी, झालेल्या आगीच्या भडक्यात पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्यांच्या हाताला आणि चेहऱ्याला भाजल्याची माहिती आहे.
पोलीस निलेश सुभाष दरेकर असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, औंधच्या जिल्हा रुग्णालयात जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र हाताला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
हेही वाचा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा