Lokshahi : तेजश्री प्रधानच्या 'लोकशाही'चा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ट्रेलर आऊट! सत्तासंघर्षात कोणाचा जीव जाणार?
Lokshahi : 'लोकशाही' या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा ट्रेलर आहे.
Lokshahi Trailer Out : 'लोकशाही' (Lokshahi) सिनेमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या जबरदस्त ट्रेलर आणि चित्रपटातील गाण्यांने रसिकांचं मन जिंकून घेतलं असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
'लोकशाही'च्या ट्रेलरमध्ये काय आहे? (Lokshahi Trailer Out)
घराणेशाहीत जगणाऱ्या प्रस्थापितांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा हव्यास ट्रेलरमधून दिसत आहे. या सत्तासंघर्षात कोणाचातरी जीव जाणार आहे, पण कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं चित्रपटात उलगडणार आहे. मनाला प्रश्नांच्या घेऱ्यात अडकवणारं कथानक, गंभीर आणि खोल संवाद, दर्जेदार कलाकारांची जुगलबंदी, मंत्रमुग्ध करणारी गाणी आणि अंगावर शहारे आणणारं पार्श्वसंगीत या समीकरणामुळे लोकशाही चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र होताना दिसत आहे.
View this post on Instagram
'लोकशाही' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटाचे निर्माते सुशीलकुमार अग्रवाल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, तेजश्री प्रधान, अमितरियान आणि सर्व कलाकार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दणक्यात पार पडला. मोहन आगाशे यांनी ‘चित्रपट निर्मितीची प्रक्रिया धमाल मजेदार होती’ असं सांगितलं असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची त्यांना प्रचंड उत्सुकता आहे. संगीत दिग्दर्शक संजय राजी या जोडीमधील राजी यांनी 'सख्या रे' हे सुमधुर आणि जयदीप बागवडकर यांनी 'ओ भाऊ' हे उत्साही गाणं गाऊन सोहळ्यातील उपस्थितांची मने जिंकली.
'लोकशाही' कधी रिलीज होणार? (Lokshahi Release Date)
'लोकशाही'चं पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 9 फेब्रुवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लोकशाही' सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखाच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्तासंघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे.
'लोकशाही' या सिनेमात मोहन आगाशे, समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि अंकित मोहन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संबंधित बातम्या