WFI Membership Suspended : भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द, वेळेत निवडणुका न झाल्याने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची कठोर कारवाई
WFI Membership Suspended : युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाच्या विरोधात कठोर कारवाई करत भारतीय कुस्ती संघाचे सदस्यत्व रद्द केले आहे.
भारत : वेळेत निवडणुका न झाल्याने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation India ) सदस्यत्व रद्द केले आहे. याआधी देखील निवडणुका वेळेत घेण्यासाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाला ताकीद दिली होती. पंरतु तरीही भारतीय कुस्ती महासंघाने वेळेत निवडणुका (Elections) घेतल्या नाहीत. त्यामुळे ही कठोर कारवाई युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने केली असल्याचं सांगण्यात येत आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने 30 मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पुढच्या 45 दिवसांमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. तसेच जर या निवडणुका झाल्या नाहीत तर तुमचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार असल्याचं या पत्रात स्पष्ट म्हटलं होतं.
UWW, the world governing body for wrestling, suspends WFI for not holding its elections on time
— Press Trust of India (@PTI_News) August 24, 2023
क्रिडा मंत्रालयाने कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघांच्या सदस्यांना निलंबित करण्यात आलं आणि अॅडहॉक कमिटी स्थापन करण्यात आली. त्यानंतर कुस्ती महासंघाच्या निवडणुकांसाठी जम्मू आणि काश्मीरचे माजी न्यायाधीश एम एम कुमार यांची निवडणुक अधिकारी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली होती.
निवडणुका का झाल्या नाहीत?
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका या 11 जुलै रोजी होणार होत्या. पण तेव्हा आसाम रेसलिंग असोसिएशनने आपल्या मान्यतेसाठी आसाम उच्च न्यायालयात निवडणुकांवर स्थगिती आणली होती. त्यानंतर अॅडहॉक समितीने आसाम कुस्ती महासंघाला मान्यता दिली होती. त्यामुळे 11 जुलै रोजीच्या निवडणुका या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर निवडणुक अधिकारी एम एम कुमार यांनी 12 ऑगस्ट ही तारीख दिली होती. पंरतु यावेळेस दिपेंद्र हुड्डा यांच्या समर्थनार्थ हरियाणा कुस्ती महासंघाने निवडणुकांवर स्थगिती आणणारी याचिका हरियाणा उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्यामुळे 12 ऑगस्ट रोजी देखील या निवडणुका रद्द करण्यात आल्या.
15 जागांसाठी होणार होत्या निवडणुका
कुस्ती महासंघाच्या या निवडणुका एकूण 15 जागांसाठी होणार आहेत. दरम्यान 12 ऑगस्ट रोजी या निवडणुका होणार होत्या. यासाठी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्यसह आणखी चार जणांनी या निवडणुकांसाठी अर्ज भरला केला होता. तसेच दिल्लीतील ऑलंपिक भवनात हे अर्ज पाठवण्यात आले. परंतु या दिवशीही या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.