Wrestlers Protest : कुस्तीपटूंचा सरकारला अल्टिमेटम! ...तोपर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही : साक्षी मलिक
Sakshi Malik on Asian Games : महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. यामध्ये आता कुस्तीपटूंनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे
Wrestlers Protest : गेल्या काही महिन्यांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या कुस्तीपटूंनी आता सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जोपर्यंत कुस्तीपटूंचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आशियाई खेळात (Asian Games) सहाभागी होणार नाही, असं वक्तव्य साक्षी मलिक हिनं केलं आहे. भाजपचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप काही महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटूंकडून करण्यात येत आहे.
'...तोपर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही'
कुस्तीपटू साक्षी मलिकने सांगितलं की, ती आणि बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्यासह इतर दोन कुस्तीपटूंच्या समस्यांचं निराकरण झाल्यानंतरच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होतील. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील लढा कायम राहील, असं सांगितलं आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी शेतकरी, खाप आणि कर्मचारी संघटनांच्या बैठकीत शनिवारी सांगितलं की, सर्व प्रश्न मार्गी लागल्यानंतरच कुस्तीपटू आशियाई स्पर्धेत सहभागी होतील.
23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा
आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणार असून 30 जूनपूर्वी संघ निवड होईल. त्याआधी सरकारने हा प्रश्न आणि कुस्तीपटूंच्या मागण्या मार्गी लावाव्या अशी, कुस्तीपटूंची मागणी आहे.
तूर्तास कुस्तीपटूचं आंदोलन स्थगित
आंदोलक कुस्तीपटूंनी तुर्तास आंदोलन स्थगित केलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंसोबत चर्चा केली होती. तब्बल सात तासांच्या चर्चेनंतर अनुराग ठाकूर यांना कुस्तीपटूंना आश्वासन दिलं आहे. 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु असं आश्वासन अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना दिलं. त्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला.
'पुन्हा आंदोलनाची रणनीती तयार करणार'
ब्रिजभूषण सिंह यांना 15 जूनपर्यंत अटक न केल्यास 16 आणि 17 जूनला पुन्हा नव्याने आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येईल, असं कुस्तीपटू बजरंग पुनियानं सांगितलं. कुस्तीपटू साक्षी मलिक यावेळी म्हणाली की, ''आम्ही आशियाई खेळांमध्ये तेव्हाच सहभागी होऊ जेव्हा या सर्व समस्या दूर होऊन आमच्या मागण्या मान्य होतील. आम्ही दररोज मानसिकरीत्या कोणत्या परिस्थितीतून जात आहोत, हे कुणीही समजू शकत नाही.'' साक्षीने कुस्तीपटूंमध्ये मतभेद असल्याची बाब फेटाळून लावली आहे. तिने सांगितलं की ''मी हे स्पष्ट करते की आम्ही सर्वजण एक आहोत. मी, बजरंग आणि विनेश आम्ही सगळे एक आहोत.''