(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karnataka Election 2023: बेळगावमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची सभा उधळली, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक
देसुर येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांची सभा आयोजीत केली होती. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांची उधळली.
Karnataka Election 2023: सध्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांची (Karnataka Election 2023) रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु करत प्रचार सुरु केला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) काही नेते देखील प्रचारासाठी बेळगावमध्ये जात आहेत. देसुर येथे काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांची सभा आयोजीत केली होती. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांची उधळली.
मराठी भाषिकांमध्येत संतापाची लाट
बेळगाव ग्रामीण मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी देसुर येथे प्रणिती शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन सभेच्या ठिकाणी जाऊन सभा उधळली. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं प्रणिती शिंदे यांना सभा न घेताच परत जावे लागले. महाराष्ट्रातील नेते मंडळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरुध्द प्रचारासाठी येत असल्याने मराठी भाषिकांमध्येत संतापाची लाट उसळली आहे.
भाजपकडून कर्नाटकच्या प्रचारासाठी देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज
कर्नाटकच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा त्या ठिकाणच्या राजकीय हालचाली वाढत आहेत. काँग्रेस सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर भाजपसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. केंद्रात पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने एप्रिल पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे . भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपने महाराष्ट्रातील सहा जणांची एक यादी तयार केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर आणि प्रसाद लाड या नेत्यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश नाही.
राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी
कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या 224 इतकी आहे. सत्तेत येणाऱ्या पक्षाकडे 113 आमदारांचं संख्याबळ असणं गरजेचं आहे.