एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नक्षल्यांशी संबंधावरुन नजरकैदेत असलेल्या सुधा भारद्वाज कोण आहेत?
कामगार नेते दिवंगत शंकर गुहा नियोगी यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन, सुधा भारद्वाज या डाव्या चळवळीशी जोडल्या गेल्या.
नवी दिल्ली : पुणे पोलिसांनी देशभरातून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पाच जणांना अटक केली. यात प्रसिद्ध कवी वरवर राव, अरुण फरेरा, व्हर्नोन गोन्साल्वीस, गौतम नवलखा आणि मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांचा समावेश आहे.
सुधा भारद्वाज यांना फरीदाबादमधून अटक करण्यात आली. त्यानंतर सुधा भारद्वाज यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात हजर केलं असता, त्यांना 30 ऑगस्टपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर इतर चौघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
कोण आहेत सुधा भारद्वाज?
सुधा भारद्वाज या गेल्या 30 वर्षांपासून ट्रेड युनियनच्या नेत्या आहेत. छत्तीसगडमधील कामगारांसाठी त्या काम करतात. मानवाधिकार चळवळीतल्याही त्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. छत्तीसगड पिपल्स यूनियन फॉर सिव्हिल लिबर्टिजच्या त्या सरचिटणीस असून, ‘जनहित’ संघटनेच्या संस्थापक आहेत. दिवंगत शंकर गुहा नियोगी यांच्या छत्तीसगड मुक्ती मोर्चाशी सुद्धा सुधा भारद्वाज संबंधित आहेत.
सुधा भारद्वाज यांची शैक्षणिक कारकीर्दही विस्मयचकित करणारी आहे. सुधा भारद्वाज यांची आई कृष्णा भारद्वाज या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या डीन होत्या. सुधा यांनी आपलं प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षण झालं. सुधा भारद्वाज या आयआयटी कानपूरच्या 1978 च्या बॅचच्या टॉपर आहेत.
2000 साली रायपूरच्या पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठातून सुधा भारद्वाज यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. 2007 पासून छत्तीसगड हायकोर्टात वकिली सुरु केली. छत्तीसगडमधील नॅशनल लॉ विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम करत होत्या.
कामगार नेते दिवंगत शंकर गुहा नियोगी यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन, सुधा भारद्वाज या डाव्या चळवळीशी जोडल्या गेल्या.
सुधा भारद्वाज यांना का अटक केली?
मुंबई, ठाणे, हैदराबाद, रांची आणि दिल्लीत काल पुणे पोलिसांच्या पथकांनी छापे मारले. यातून काही महत्वाची कागदपत्रं, पुस्तकं, पत्रं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं. 31 डिसेंबर 2017 ला पुण्यात शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती. या परिषदेला नक्षलवाद्यांनी आर्थिक मदत केली असल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात याआधीही आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सुधा भारद्वाज यांच्या घरातून काय जप्त केले?
फरीदाबाद येथील सुधा भारद्वाज यांच्या घरात महाराष्ट्र पोलिसांची टीम अचानक दाखल झाली. सुधा भारद्वाज यांना ताब्यात घेण्यात आले आणि अवैध कृती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. सुधा भारद्वाज यांची मुलगी मायशाने दिलेल्या माहितीनुसार, “10 जणांचं पथक सकाळी सकाळी घरात आलं. त्यांच्याकडे कोणतेही सर्च वॉरन्ट नव्हतं. मात्र काही कागदपत्रं होती. त्यांनी आमचे मोबाईल आणि लॅपटॉप नेले आणि शिवाय सोशल नेटवर्किंग साईट्सवरील अकाऊंट्सचे पासवर्डही मागितले.”
सुधा भारद्वाज यांच्या अटकेचा निषेध
“भारतात केवळ एकाच एनजीओला जागा आहे आणि तिचे नाव आरएसएस आहे. इतर सर्व एनजीओ बंद करुन टाका. सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात पाठवा आणि जे लोक तक्रार करतात, त्यांना गोळ्या मारा. न्यू इंडियामध्ये तुमचं स्वागत.”, अशी उपरोधिक टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सुधा भारद्वाज यांच्या अटकेवर बोलताना म्हटले, “सुधा भारद्वाज या हिंसा आणि अवैध गोष्टींपासून तेवढ्या दूर आहेत, जेवढे अमित शाह त्या गोष्टींच्या जवळ आहेत.”
संबंधित बातमी : मोदींच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी देशभरात धाडसत्र, पोलिसांच्या हाती पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement