West Bengal Election 2021 | पाच वर्ष हातात सत्ता द्या, 70 वर्षाचं नुकसान भरुन काढतो; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंगाली जनतेला आवाहन
West Bengal Election 2021 : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या एका रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (श्PM Modi) म्हणाले की, पाच वर्षे बंगालची सत्ता द्या, 70 वर्षाचं नुकसान भरुन काढतो.
कोलकाता : पश्चिम बंगालची गेली 70 वर्षे वाया गेली आहेत. या 70 वर्षात राज्याचं मोठं नुकसान झालं असून केवळ पाच वर्षे भाजपच्या हाती सत्ता द्या, 70 वर्षात झालेलं नुकसान भरुन काढतो असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालवासियांना दिलं आहे. ते खरगपूरमध्ये आयोजित एका रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांचा उल्लेख विकासातील अडथळा असा केला.
जर बंगालच्या जनतेने भाजपच्या हाती सत्ता दिली तर राज्याचा नियोजनबद्ध विकास करण्यात येईल. या राज्यातल कृषी, सिंचन आणि कोल्ड स्टोरेजची सुविधा देण्यात येईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या जनतेला आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ममता बॅनर्जी यांच्या प्रचार दौऱ्याने बंगालचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
जनसंघाचे जनक हे बंगालचे होते त्यामुळे खऱ्या अर्थाने बंगालचा कोणता पक्ष असेल तर तो म्हणजे भाजप आहे असं पंतप्रधान म्हणाले. ममता बॅनर्जी या बंगालच्या विकासातील अडथळा असल्याचं सांगत त्यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केल्याचं पंतप्रधान म्हणाले.
देशातील टोलनाके वर्षभरात हटवणार, टोलसाठी GPS Tracker लावणार; नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी या आधी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती. निवडणूक आयोग अमित शाह चालवत आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या काही घटनांचा आधार घेत ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
माझी हत्या करण्याचा कट आखला जात आहे का, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाकडून आपली सुरक्षाही हटवण्यात आल्याबाबत ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय गृहमंत्री देश चालवणार की, बंगालमध्ये आम्हाला धक्का देण्यासाठी कट रचणार, असा प्रश्नार्थक सूर आळवत त्यांनी जोरदार टोला लगावला होता.
नंदीग्राम येथे झालेल्या एका प्रचारसभेमध्ये ममता बॅनर्जी यांना दुखापत झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेनंतर निवडणूक आयोगाने सुरक्षा संचालक विवेक सहाय आणि पूर्व मेदिनीपूरचे पोलीस संचालक प्रवीण प्रकाश यांना 14 मार्चला निलंबित केलं आहे.