Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या दिल्लीत भेटीगाठी सुरुच, आज नितीन गडकरींची भेट घेणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसांच्या दिल्ली भेटीवर आहेत. त्या आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेणार आहेत.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्या आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जींच्या दिल्ली भेटीचा आज चौथा दिवस असून त्यांनी या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे.
आपल्या दिल्ली भेटीच्या चौथ्या दिवशी ममता बॅनर्जी या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, जावेद अख्तर, शबाना आझमी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचं समजतंय.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीदरम्यान पेगॅसस प्रकरणावरुन देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पेगॅसस प्रकरणामध्ये ज्या 40 लोकांवर केंद्र सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप केला जातोय त्यामध्ये ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचाही समावेश आहे.
देशात 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी या विरोधी पक्षांचा चेहरा होणार का असा सवाल विचारला जातोय. लोकसभा निवडणुकीच्या रणनितीचा एक भाग म्हणून आणि मोदींना पर्याय म्हणून ममता बॅनर्जी दिल्लीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याची चर्चाही सुरु आहे. पण पहिल्यांचा मोदींविरोधात सर्वांनी एकत्र यावं, विरोधी पक्षांचा चेहरा कोण असेल हे नंतर ठरवलं जाईल असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलंय.
पश्चिम बंगालचा नाव बदलचा विषय तसेच बंगालला जास्त प्रमाणात कोरोनाच्या लसी देण्यात याव्यात यासाठी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. या दोघांमधील ही भेट 45 मिनीटे चालली होती.
महत्वाच्या बातम्या :