Bloomberg Report: उष्णतेच्या लाटेमुळे अर्थव्यवस्था कोलमडणार, ब्लॅक आऊटचाही धोका
Heatwave Update: देशात मे महिन्यात अतिउष्ण तापमानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विद्युत उपकरणांच्या अतिवापरामुळे विजेची कमतरता देखील भासू शकते.
Heatwave Forecast: देशातील विविध भागांत सध्या अवकाळी पाऊस (Rainy) पडत आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट नोंदवली जात आहे. दरम्यान, मे महिन्यात देशातील अनेक भागात तीव्र उष्णतेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उन्हाचा दाह कमी करण्यासाठी विजेचा अतिवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं विद्युत सेवा प्रभावित होऊन उद्योगधंद्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. असे झाल्यास परिणामी अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते. विजेची मुबलक पुरवठा न झाल्यास अनेकांनी ब्लॅक आऊटसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व भारतातील काही भागात उष्ण हवामान दिसून येईल. देशाच्या पूर्व आणि मध्य भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी, ब्लूमबर्गच्या 2022 च्या अहवालानुसार,आशियातील देशांना यावर्षी विक्रमी उष्णतेच्या लाटांचा (Heat Waves) सामना करावा लागणार आहे. जागतिक पातळीवरील गव्हाच्या पुरवठ्यावर उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला आहे, त्यामुळे इतर व्यवसाय आणि व्यापारातील गुंतवणुकीच्या निर्णयांवेळीही आधी खराब हवामानाचा विचार करावा लागत आहे.
अतिउष्ण तापमानामुळे ब्लॅक आऊटचा धोका
उष्णतेच्या लहरींमुळे वातानुकूलित यंत्रे (AC) आणि पंखे (Fans) यांचा वापर वाढतो. यासारख्या उपकरणांमुळे विजेचा वापर वाढतो, त्यामुळे पॉवर ग्रीडवर जास्त दाब येतो आणि ब्लॅक आऊटचा धोका वाढतो. जास्त उष्णता विजेच्या उत्पादकतेला हानी पोहोचवते, याशिवाय ते लोकांसाठी घातकही ठरू शकते. यावर्षी उष्णतेचा सामना करणारा भारत हा एकमेव देश नाही.
भारतासह इतर देशांतही उष्णतेची लाट
यावर्षी उष्णतेचा सामना करणारा भारत हा एकमेव देश नाही. मिळालेल्या माहितीनुसार, थायलंड आणि बांगलादेशातील तापमानातही सातत्याने वाढ होत आहे. चीनच्या युनान प्रांतात तर उष्णतेमुळे दुष्काळ पडला आहे.
यंदा देशात 96 टक्के पावसाचा अंदाज
यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस (Rain) होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दिर्घकालीन अंदाज आहे. देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 835 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटलं जातं. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते.
मे महिन्यात पश्चिम, उत्तर आणि मध्य भारताच्या काही भागात तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर कुठे उष्णतेचा पारा वाढला आहे. काही ठिकाणी पावसामुळं उष्णतेच्या लाटेपासूनही नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने उष्णतेमुळे अनेक भागात सतर्कतेचा इशारा दिला होता.
संबंधित बातमी:
Weather Forecast: काळजी घ्या! मे महिन्यात कमाल तापमान अधिक राहणार, हवामान विभागाचा अंदाज