Cyclone Amphan | अॅम्फान चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याचा अंदाज : हवामान विभाग
अॅम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस बंगालच्या खाडीत प्रवेश न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबई : अॅम्फान चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात अॅम्फान अतिशय भीषण चक्रीवादळ बनू शकतं, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या खाडीच्या दक्षिणेत असलेलं हे वादळ हळूहळू वायव्य दिशेला सरकत आहे. येत्या काही तासात याचं रुपांतर भीषण चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधील दीघा आणि हटिया इथे 20 मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी हे वादळ धडकण्याची शक्यता आहे.
पुढील तीन दिवस बंगालच्या खाडीत प्रवेश न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जे मच्छिमार आधीच समुद्रात आहेत, त्यांना परतण्यास सांगितलं आहे. या चक्रीवादळाचा परिणाम देशातील आठ राज्यांवर जाणवू शकतो. परिणामी इथे जोरदार पाऊस आणि आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटांवरही या चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो.
ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाजपूर, भद्रक, बालासोर, मयूरभंज, गंजम, जगतसिंहपूर, गजपती, नयागड, कटक, केंद्रपाडा, खुर्दा आणि पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे तामिळनाडूतही अॅम्फान चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. रविवारी वादळी वाऱ्यामुळे शेकडो झाडं कोसळली तसंच मोठं नुकसानही झालं. कोईम्बतूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये झाडं कोसळल्याचं वृत्त आहे.
11 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची सोय चक्रीवादळाचा धोका पाहता खबरदारी म्हणून सुमारे 11 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची सोय केली आहे. जगतसिंहपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर या समुद्रकिनाऱ्यावरील चार जिल्ह्यांवर नजर ठेवून आहोत, अशी माहिती ओदिशाचे विशेष बचाव आयुक्त पीके जेना यांनी दिली.
एनडीआरएफची 17 पथकं तैनात अॅम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आपली 17 पथकं तैनात केली आहेत आणि इतर पथकांना तयार राहण्यास सांगितलं आहे. एनडीआरएफच्या एका पथकात सुमारे 45 जणांचा समावेश असतो. एनडीआरएफ परिस्थितीवर देखरेख ठेवून आहे. आम्ही राज्य सरकार, हवामान विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती एनडीआरएफचे संचालक एस एन प्रधान यांनी व्हिडीओ मेसेजद्वारे दिली.