परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींच्या लेकीसंदर्भात आक्षेपार्ह टीका; महिला आयोग ट्रोलर्सवर संतापला, महत्त्वाचं आवाहन
आपल्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरण्यात येत असल्याने विक्रम मिस्री यांनी आपलं ट्विटर अकाऊंट प्रोटेक्ट केलं आहे. भारताकडून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत प्रत्येक देशवासीय नागरिक आपलं योगदान देत आहे. भारत माता की जय म्हणत पाकिस्तानच्या नापाक कारवायांना प्रत्त्युतर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यात येत आहे. सोशल मीडियावर सैन्य दलाचे जवान आणि अधिकारी यांच्या कार्याला, शौर्याला सॅल्यूट केला जात आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचेही देशभरातून कौतुक होत आहे. त्याचसोबत ज्यांच्या पत्रकार परिषदेकडे देशाचे, जगाचे लक्ष लागलेले असते त्या परराष्ट्र सचिवांचेही कौतुक होत आहे. पाकिस्तानला (Pakistan) आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड पाडणाऱ्या विक्रम मिस्री (Vikram misri) यांचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे त्यांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याने तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे. आता, याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने (Women commission) गंभीर दखल घेत, पत्रक जारी केलं आहे.
आपल्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरण्यात येत असल्याने विक्रम मिस्री यांनी आपलं ट्विटर अकाऊंट प्रोटेक्ट केलं आहे. भारताकडून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. पण, त्यानंतर काही तासांतच शस्त्रीसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याने सोशल मीडियातील ट्रोल आर्मीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना टार्गेट केलं. गद्दार, देशद्रोही अशा शब्दांचा प्रयोग करत मिस्री यांच्यावर आगपाखड करण्यात आली. हद्द म्हणजे मिस्री यांची कन्या डिडोन मिस्री हिच्याबद्दलही ट्रोलर्सकडून आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला. त्यातूनच व्यथित झालेल्या मिस्री यांनी आपलं ट्विटर अकाऊंट प्रोटेक्ट केलं आहे. आता, ट्रोलर्सच्या या टोलधाडीची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी सोशल मिडिया व नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने मिस्री यांच्यावरील टीकेची गंभीर दखल घेतली असून परपत्रक जारी करत आवाहन केलं आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या कुटुंबीयांवर, विशेषत: त्यांच्या मुलीबद्दल अवमानजनक आणि निषेधार्ह कमेंट सोशल मीडियातून करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने या गैरकृत्यावर परखड भाष्य केलं आहे. परराष्ट्र सचिव मिस्री यांच्या मुलीचे वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे गंभीर आणि बेजबाबदार कृत्य आहे. तसेच, हे गोपनीयतेच्या कायद्याचेही उल्लंघन करणारे असून त्यांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणारे असल्याचं महिला आयोगाच्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
विक्रम मिश्री यांच्यासारखे देशाच्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांवर व्यक्तिगत टीका टिपण्णी करणे कदापि सहन केले जाणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांवर होत असलेल्या व्यक्तिगत टीका करणे नैतिकदृष्ट्याही चुकीचे आहे. आपण सर्वांनी सभ्यता आणि संयमित वर्तणूक दाखवली पाहिजे. आपण, यातून पुढे गेलं पाहिजे, असेही महिला आयोगाने परिपत्रकात म्हटलं आहे.


















