Ethanol Fueled Car: पूर्णपणे इथेनॉलवर धावणारी जगातील पहिली कार! नितीन गडकरींनी केली नवीन कार लाँच; पाहा फिचर्स
Toyota Innova Hycross : नितीन गडकरींनी केवळ इथेनॉलवर धावणारी कार लाँच केली आहे, या अनोख्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याला फायदा होणार आहे. जाणून घ्या या नव्या कारचे फिचर्स...
नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी (29 ऑगस्ट) 100 टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या गाडीचं अनावरण केलं. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross) असं या कारचं नाव आहे. ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल कार (Electrified Flex fuel Car) आहे. S6 स्टेज-2 मानांकनानुसार ही कार तयार करण्यात आली आहे, त्यामुळे भारतीय ग्राहकांना आता स्वस्त इंधनाचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
Live from the Launch of World's 1st Prototype of BS-6 (Stage II) ‘Electrified Flex Fuel Vehicle’ developed by Toyota Kirloskar Motor, New Delhi. #ElectrifiedFlexFuelVehicle #FlexFuelVehicle https://t.co/zBLSVzqVmT
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 29, 2023
पेट्रोल-डिझेलवरील निर्भरता कमी करण्यासाठी प्रयत्न
भारतात गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलवरील निर्भरता कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. ईव्ही मार्केटला (EV Market) चालना देण्यासाठी सबसिडीपासून अनेक गोष्टींची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यापूर्वी हायड्रोजन कारची देखील चर्चा सुरु होती, पण आता इथेनॉल इंधनाचा (Ethanol Fuel) पर्याय समोर ठेवण्यात आला. ब्राझिलमध्येही जैविक इंधनावर जवळपास 93 टक्के वाहनं धावतात.
काय आहेत या गाडीची वैशिष्ट्यं?
- पेट्रोलऐवजी ही कार पूर्णपणे इथेनॉलवर धावणार आहे.
- टोयोटाची ही गाडी स्वतःच इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करेल, त्यामुळे कार EV मोडवर देखील वापरता येईल.
- गाडीमध्ये एक लिथियम-आयन बॅटरी पॅकही देण्यात आला आहे.
- ही गाडी एक प्रोटोटाईप आहे.
- ही जगातील पहिली BS6 फेज-2 इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स-इंधन कार आहे.
- हायब्रीड प्रणालीमुळे ही कार इथेनॉल इंधनापासून 40% वीज देखील निर्माण करू शकते.
गाडीचं हायब्रिड व्हर्जन सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध
टोयोटाच्या या गाडीचं हायब्रिड व्हर्जन सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, हे त्याहून वेगळं असं हायक्रॉस व्हर्जन आहे. यामध्ये 2.7 लीटर फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे. यापूर्वी टोयोटा मिराई ही हायड्रोजन कार सुद्धा लाँच करण्यात आली आहे.
कुठे उपलब्ध होणार इथेनॉल?
सध्या इथेनॉलची किंमत सुमारे 60 रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच, ते पेट्रोलपेक्षा कितीतरी जास्त किफायतशीर आहे आणि स्वस्त आहे. परंतु सध्या तरी इथेनॉल इंधनासाठी वेगळे असे पंप नाही. यावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, "इथेनॉल इंधन असलेल्या वाहनांसाठी अजूनही समस्या आहे. देशात इथेनॉल पंप नाहीत. म्हणूनच मी पेट्रोलियम मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी सर्व पेट्रोलियम कंपन्यांना इथेनॉल पंप सुरू करण्याचे आदेश द्यावेत."
शेतकऱ्यांना होणार फायदा
इथेनॉल हे इंधन ऊस, मका अशा पिकांपासून तयार होतं, त्यामुळे या इंधनाचा वापर वाढल्यास ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरणार आहे. सोबतच, यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल. देशातील 40 टक्के प्रदूषण हे गाड्यांमुळे होतं. इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास देशातील प्रदूषण देखील कमी होईल, असं गडकरी यावेळी म्हणाले.
असं तयार होतं इथेनॉल
स्टार्च आणि ऊसाच्या मळीपासून इथेनॉल तयार होतं, हे एक प्रकारचं अल्कोहोल असतं. पेट्रोलमध्ये मिसळून ते वापरण्यात येतं. ऊसाच्या रसापासून, मका, बटाटे, कुजलेला भाजीपाला, स्टार्चयुक्त पदार्थातून इथेनॉल तयार करण्यात येतं.