केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून तीन दिवस जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कलम-370 आणि 35 ए हटवल्यानंतर पहिल्यांदाच दौरा
अमित शाह (Amit Shah) आजपासून तीन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर दाखल झाले आहेत. कलम 370 रद्द झाल्यानंतर अमित शाहांचा हा पहिलाच दौरा आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आजपासून तीन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा डोकं वर काढत असताना त्यावरच्या उपाययोजनांसाठी गृहमंत्र्यांचा हा दौरा आहे. रस्त्यावर जवान, आकाशात ड्रोननं नजर, चौकाचौकात बंकर्समध्ये बंदुकधारी, पर्यटकांच्या तपासणीसाठी विशेष आदेश, 700 संशयितांची आधीच धरपकड ही सगळी तयारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून तीन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर दाखल झाले आहेत. कलम 370 रद्द झाल्यानंतर अमित शाहांचा हा पहिलाच दौरा आहे.
गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेटेड किलिंगचे प्रकार वाढले आहेत. गेल्या महिनाभरातच जवळपास दहा सामान्य नागरिक अशा हल्ल्यांना बळी पडले आहेत. काश्मीरमध्ये 1990 सारखी परिस्थिती निर्माण होतेय का अशीही चर्चा त्यामुळे सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर स्थितीचा थेट आढावा घेण्यासाठी गृहमंत्री काश्मीरमधे दाखल झालेत.
श्रीनगर एअरपोर्टवर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमित शाहांचं स्वागत केलं. त्यानंतर एअरपोर्टवरुनच काश्मीरचा शहीद पोलीस परवेज अहमद याच्या घरी शाह थेट पोहचले. जून 2021 मध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात परवेज शहीद झाला होता. अमित शाहांनी त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. या तीन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यात अमित शाहा वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटनही करणार आहेत. काश्मीरमधून दुबईसाठी थेट फ्लाईट सुरु होतेय. त्यांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. शिवाय आज उपराज्यपालांच्या उपस्थितीत त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठकही घेतली. दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी उपाययोजनांवर याबाबत चर्चा झाल्याचं समजतंय.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रातले अनेक मंत्री काश्मीरचा दौरा करत आहेत. गेल्या तीन महिन्यातच जवळपास 50 केंद्रीय मंत्र्यांनी काश्मीरचे दौरे केलेत. काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याआधी पुन्हा राज्याचा दर्जा बहाल होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर केंद्रानं केलेली कामं पोहचवण्यासाठी हे दौरे इतक्या वेगानं आखले जात आहेत. त्यात कलम 370 रद्द झाल्यानंतर अमित शाहांचा हा पहिलाच दौरा आहे.
या दौऱ्यासाठी पॅरा मिलिट्रीच्या 50 अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शिवाय पर्यटकांनाही अनेक रस्ते वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ड्रोन, बंकर्स, हवाई कॅमेरे या सगळ्या माध्यमातून काश्मीरच्या रस्त्यारस्त्यावर नजर ठेवली आहे. कलम 370 रद्द होऊन आता दोन वर्षे उलटली आहेत. पण कोरोनाचं संकट संपल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादही पुन्हा डोकं वर काढताना दिसतोय. त्या पार्श्वभूमीवर आता अमित शाहांचा हा दौरा काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करु शकणार का हे पाहावं लागेल.