नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना न बोलावणं, हे सनातन धर्माचं उत्तम उदाहरण : उदयनिधी स्टॅलिन
Udayanidhi Stalin: नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना न बोलावणं, हे सनातन धर्माचं उत्तम उदाहरण, असं वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं आहे.
Udayanidhi Stalin Sanatana Dharma Remarks: द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu CM MK Stalin) यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) सध्या चर्चेत आहेत. उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सध्या गोंधळ सुरू आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे, तर अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. आता त्यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नसणं, हेच सनातन धर्माचं उत्तम उदाहरण असल्याचं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.
सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आक्रमक झालेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी माफी मागावी असा सूर आवळला गेला होता. त्यावरुन सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे, असं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, आधीपासूनच सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावरुन चर्चेत असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबतच आणखी एक वक्तव्य केलं आहे. एकिकडे स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरुन आधीपासूनच गोंधळ सुरू आहे. तर दुसरीकडे स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरुन आणखी एक वक्तव्य केलं आहे. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, "माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नसणं, हे सनातन धर्माचं उत्तम उदाहरण आहे."
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरुन भाजपनं विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच, अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. भाजपनं विरोधकांच्या आघाडीला उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरुन माफी मागण्यास सांगितलं आहे. दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीतही उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरुन वेगवेगळी वक्तव्य समोर आली आहेत. इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या काही पक्षांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तर, काहींनी उदयनिधी यांनी बोलताना संयम बाळगायला हवा, असा सल्लाच दिला आहे.
ममता बॅनर्जींचा उदयनिधी स्टॅलिन यांना सल्ला
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "मला तमिळनाडूच्या लोकांबद्दल खूप आदर आहे, पण माझी त्यांना नम्र विनंती आहे की, प्रत्येक धर्माच्या स्वतःच्या भावना असतात. अशा कोणत्याही प्रकरणात आपण अडकू नये. कोणताही वर्ग दुखावला जाईल, असं वागू नये."
काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन?
उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे.
उदयनिधी स्टॅलिन वक्तव्यावर ठाम
उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं, सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे.