(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Coronavirus Cases : जगाला ओमिक्रॉनची धास्ती; देशात मात्र कोरोना प्रादुर्भावात घट
Today India Coronavirus Cases : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं जगभरात धास्ती पसरवली आहे. भारतात मात्र कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Today India Coronavirus Cases : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळं संपूर्ण जग धास्तावलं आहे. अशातच देशात मात्र अद्याप एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती काल (मंगळवारी) राज्यसभेत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. ओमिक्रॉनचं संकट (Omicron) टाळण्यासाठी प्रत्येकानंच सतर्क राहण्याची गरज आहे. देशात सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देशात जवळपास 9 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात कोरोनामुळं 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत देशांत 10 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती मिळाली आहे.
24 तासांची परिस्थिती काय?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 8954 रुग्ण आढळून आले आहेत. या काळात 267 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 10207 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 1520 सक्रिय रुग्ण घटले आहेत. त्यानंतर आता देशात एकूण 99023 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
कोरोनाचे एकूण आकडे
आतापर्यंतच्या एकूण आकडेवारीबाबत बोलायचं झालं तर, देशात एका दिवसात कोरोनाच्या 8,954 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात एकूण बाधितांची संख्या वाढून 3,45,96,776 वर पोहोचली होती. तर आतापर्यंत 4,69,247 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 3,40,28,506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात दिवसभरात 678 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (मंगळवारी) 678 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 83 हजार 435 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
राज्यात काल (मंगळवारी) 35 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7555 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 83 हजार 421 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 963 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 55 , 11, 394 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Omicron : तुम्हाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं कसं ओळखणार? जाणून घ्या कसं शोधायचं या नव्या व्हेरियंटला