कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घ्यावा, NEGVAC च्या नव्या गाईडलाईन्स
नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविडच्या नवीन शिफारसी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वीकारल्या आहेत.
नवी दिल्ली : आता NEGVAC च्या नव्या गाईडलाईन्सनुसार कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घ्यावा लागणार आहे. आधी सहा महिने आणि नंतर नऊ महिने अशा शिफारसी करण्यात आल्या होत्या. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे यांनी ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. यापुढे लस टोचून घेण्यासाठी आलेल्यांची रॅपिड अँटीजेन कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. स्तनदा मातांनीही लस घेण्यास प्रतिबंध नाही. पहिल्या डोसनंतर कोरोनाची लागण झाली तर कोरोनामुक्त झाल्यावर तीन महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे.
कोरोना लसी संदर्भात नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड (NEGVAC) नवीन शिफारसी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वीकारल्या आहेत. या नवीन गाईडलाईन्स राज्य/केंद्रशासित प्रदेशांना कळवण्यात आल्या आहेत. नव्या शिफारशींनुसार, कोरोनातून बरे झाल्यानंतर आता तीन महिन्यानंतर लसीचा डोस घ्यावा लागणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की पहिल्या डोसनंतर संसर्ग झाल्यास कोरोनामुक्त झाल्यानंतर दुसरा डोस 3 महिन्यांनी मिळणार आहे. रुग्णालयात दाखल किंवा आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या कोणत्याही गंभीर आजाराच्या रुग्णांना देखील लसीकरण होण्यापूर्वी 4-8 आठवडे थांबावे लागेल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असेही म्हटले आहे की लस टोचल्यानंतर अथवा कोविड बाधित झाल्यानंतर आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर 14 दिवसांनंतर कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. स्तनपान देणाऱ्या महिलांनाही लसीकरण करण्याची शिफारस केली आहे. लसीकरण करण्यापूर्वी अॅटीजेन चाचणीची गरज नसल्याचेही सांगण्यात आले आहे.