एक्स्प्लोर
मुंबईकर सुनील देवधर, त्रिपुरात डाव्यांचा गड उद्ध्वस्त करणारा भाजपचा नायक
गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या सीपीएमला फक्त 19 जागांवर समाधान मानावं लागलं. पण सुनील देवधर यांनी डाव्यांचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावून, तिथे सत्तापालट करण्याचे महत्त्वाचे काम या विधानसभा निवडणुकीत केले.
नवी दिल्ली/ अगरतळा : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्रिपुरामध्ये भाजपने जवळजवळ एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. कारण येथे भाजपने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या सीपीएमला फक्त 19 जागांवर समाधान मानावं लागलं. पण सुनील देवधर यांनी डाव्यांचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावून, तिथे सत्तापालट करण्याचे महत्त्वाचे काम या विधानसभा निवडणुकीत केले.
सुनील देवधर यांनी त्रिपुरात सत्ताबदल कसा घडवून आणला?
मोदी आणि अमित शाह यांनी सुनील देवधर यांना तीन वर्षापूर्वी त्रिपुरामध्ये पक्षाचे प्रभारी म्हणून नेमलं, त्यांच्या नियुक्तीवेळी त्रिपुरात पक्षाला कोणताही जनाधार नव्हता. गेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या 50 पैकी 49 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. पण त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी तीन वर्ष त्रिपुराचा सर्व भाग पिंजून काढला. माणिक सरकार यांच्या खुर्चीला हादरवण्यासाठी ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवला.
त्यांनी सुरुवातीला त्रिपुरातील तरुणांना पक्षाशी जोडलं. शिवाय, वेगवेगळ्या वर्गातील नागरिकांच्या भेटी घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
60 मतदारसंघाचा दौरा
भाजपच्या विजयानंतर सुनील देवधर यांचे निकटवर्तीय कपिल शर्मा यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, “देवधर यांनी जवळपास सर्व 60 विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यात बूथ कमिटीची बांधणी केली. या कमिट्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न निवडणुकीच्या प्रचार रॅलीमधून मांडले जाऊ लागले. त्यामुळे त्रिपुरालीत नागरिक भाजपशी जोडले जाऊ लागले.” जवळपास 30 हजार तरुणांना त्यांनी या कामात सहभागी करुन घेतल्याचं, शर्मा यांनी सांगितलं.
याशिवाय, त्रिपुरातील डावे, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करण्याचं महत्त्वाचं कामही देवधर यांनी केलं. यासाठी त्यांनी या तिन्ही पक्षातील अनेक दिग्गज नेते आणि आमदारांना भाजपात सहभागी करुन घेतले. त्याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत झाला.
कोण आहेत सुनील देवधर?
सुनील देवधर यांचा जन्म पुण्यात झाला. लहानपणीपासून संघाच्या मुशीत वाढलेल्या देवधरांनी तब्बल 12 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून ईशान्य भारतात काम केलं आहे. शिवाय, बंगाली भाषेसह इतर अनेक भाषांवर त्यांचे प्रभूत्व आहे. मेघालय, त्रिपुरा, नागालँडमधील खासी आणि गारो सारख्या स्थानिक जातींमधील लोकांत त्यांच्या चांगला जनसंपर्क आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी
2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदार संघाची जबाबदारी होती. यावेळी त्यांनी बूथ बांधणीच्या कामामुळे पंतप्रधान मोदींचा विक्रमी मताधिक्क्याने विजय झाला.
त्याशिवाय, 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या निवडणुकीत त्यांच्याकडे 10 मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी होती. त्यातील सात जागांवर त्यांनी भाजपला विजय मिळवून दिला.
‘माय होम इंडिया’द्वारे ईशान्या भारतासाठी काम
दरम्यान, 2005 पासून ‘माय होम इंडिया’च्या नावाने एक स्वयंसेवी संस्थादेखील सुरु केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ईशान्य भारतातील नागरिकांना सर्वप्रकारची मदत केली जाते. ‘माय होम इंडिया’च्या कामाचा फायदा भाजपला या निवडणुकीत झाल्याचे बोलले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement