Mira Bhayandar Police Raid : राज्यातील सर्वात मोठी कारवाई! तब्बल 12 हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त, 12 जणांना बेड्या; मीरा-भाईंदर पोलिसांनी कसा केला पर्दाफाश? A टू Z माहिती
Mira Bhayandar Police Raid : मीरा-भाईंदर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल 12 हजार कोटी रुपयांची एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे.

Mira Bhayandar Police Raid : मीरा-भाईंदर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल 12 हजार कोटी रुपयांची एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तेलंगणातील चेरापल्ली येथे चालवल्या जात असलेल्या या गुप्त फॅक्टरीवर छापा टाकून 32 हजार लिटर कच्चे ड्रग्ज (रॉ मटेरियल) जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण 12 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये फॅक्टरीचा मालक, एक केमिकल अॅनालायझर तसेच एक विदेशी नागरिकाचाही समावेश असल्याची माहिती मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली आहे.
25 लाखांवरून 12 हजार कोटींपर्यंतचा प्रवास
या कारवाईची सुरुवात केवळ 200 ग्रॅम ड्रग्ज पकडल्यानंतर झाली होती. त्यावरून सुरू झालेल्या तपासाचा धागा पकडत पोलिसांनी चौकशीचा विस्तार केला आणि अखेर 25 लाखांच्या मालापासून तब्बल 12 हजार कोटींपर्यंतच्या अमली पदार्थांच्या जाळ्याचा पर्दाफाश केला.
पुरवठ्याचे आंतरराज्य जाळे
पोलिसांच्या तपासात या ड्रग्ज फॅक्टरीतून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असल्याचे उघड झाले आहे. जप्त केलेले ड्रग्ज अत्यंत उच्च दर्जाचे असून याचा वापर आंतरराज्य पातळीवरील तस्करीसाठी केला जात होता.
आरोपींची पार्श्वभूमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फॅक्टरीचा मालक हा बीएसई इंजिनियर आहे. त्याने रासायनिक प्रक्रियेतील तज्ज्ञांच्या मदतीने फॅक्टरी उभारली होती. त्याच्यासोबत केमिकल अॅनालायझर आणि परदेशी नागरिकालाही अटक करण्यात आली आहे.
देशभरात खळबळ
या कारवाईमुळे महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडले गेलेले ड्रग्ज हे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक ठरत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त?
मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक म्हणाले की, क्राइम ब्रांच युनिट फोरच्या टीमने एक महिन्यापूर्वी पेडलर्सला अटक केले होते. यानंतर तपासाला सुरुवात झाली आणि आम्ही तेलंगणातील कारखान्यापर्यंत पोहोचलो. 25 ग्रॅमपासून ते 32000 लिटर पर्यंत पोहोचत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत क्राईम ब्रँच युनिटने काम केले आहे. एक महिन्याचा सतत मेहनतीनंतर पोलिसांना यश मिळाले आहे. आतापर्यंत या प्रकरणात 12 आरोपींना अटक केली आहे. फॅक्टरीच्या मालकाला ताब्यात घेतलेले आहे. केमिकल अॅनालायझरला ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे माहिती त्यांनी दिली. तर या कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कौतुक केल्याची माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली.
आणखी वाचा
ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक
























