Terror Plot in Telangana Hyderabad : हैदराबादमध्ये आयसिसशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप
Terror Plot in Telangana Hyderabad : पोलिसांना त्यांच्याकडून अमोनिया, सल्फर आणि अॅल्युमिनियम पावडरसारखे स्फोटक पदार्थ सापडले आहेत. सिराजने विजयनगरम येथून स्फोटक पदार्थ गोळा केले होते.

Terror Plot in Telangana Hyderabad : हैदराबादमध्ये दहशतवादी संघटना आयसिसशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे. रविवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी दोघांनाही अटक केली आणि बॉम्बस्फोट रोखला. संशयित दहशतवाद्यांची सिराज उर रहमान (29) आणि सय्यद समीर (28) अशी नावे आहेत. हैदराबादवर हल्ला करू इच्छिणाऱ्या सौदी अरेबियातील सक्रिय आयसिस मॉड्यूलकडून दोघांनाही सूचना मिळत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना त्यांच्याकडून अमोनिया, सल्फर आणि अॅल्युमिनियम पावडरसारखे स्फोटक पदार्थ सापडले आहेत. सिराजने विजयनगरम येथून स्फोटक पदार्थ गोळा केले होते. सध्या संशयित दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाईल.
सिराजला विजयनगरम येथून आणि समीरला हैदराबाद येथून अटक
आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काउंटर इंटेलिजेंस सेलने संयुक्त कारवाईअंतर्गत (Terror Plot in Telangana Hyderabad) ही कारवाई केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिराजला प्रथम आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान सिराजने समीरचे नाव उघड केले, त्यानंतर पोलिसांनी त्याला हैदराबाद येथून अटक केली. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
बेंगळुरू रामेश्वरम कॅफे स्फोटात ISIS कनेक्शन उघड
कर्नाटकातील बेंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये IED स्फोट झाला होता, ज्यामध्ये 10 जण जखमी झाले होते. तपासादरम्यान, बॉम्बस्फोटामागील दहशतवादी संघटना ISIS चा कट उघड झाला. त्यानंतर NIA टीमने बेंगळुरूसह अनेक ठिकाणी छापे टाकले. चेन्नईतील सिद्धरपेट आणि बिद्यार येथून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी मुंबईतून दोन ISIS दहशतवाद्यांना पकडण्यात आले
17 मे रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली. NIA न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना तपास संस्थेने 3 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. अटक केलेल्या आरोपींची नावे अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा खान अशी आहेत. NIA नुसार, दोघेही दहशतवादी संघटना ISIS च्या स्लीपर सेलशी संबंधित आहेत. 2023 च्या एका प्रकरणात मुंबईत आयईडी (बॉम्ब) बनवण्याच्या आणि चाचणी करण्याच्या प्रकरणात ते फरार होते. गेल्या दोन वर्षांपासून हे आरोपी इंडोनेशियातील जकार्ता येथे लपून बसले होते. अटकेनंतर दोघांनाही मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, या अटकेमुळे मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















