Piyush Goyal : राजू शेट्टींनी घेतली मंत्री गोयलांची भेट, सरकार लवकरच वस्त्रोद्योगासाठी नवीन धोरण जाहीर करणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली.
Piyush Goyal : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन शेती संदर्भातील विविध प्रश्न मांडत आहेत. काल (18 ऑगस्ट) त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विविध प्रश्न मांडले होते. तर आज त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. देशामध्ये शेतीनंतर वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती उपलब्ध आहे. त्यामुळं केंद्र सरकार लवकरच वस्त्रोद्योग व्यवसायाला नवसंजीवनी देणारे नवीन धोरण जाहीर करणार असल्याचे माहिती पियुष गोयल यांनी राजू शेट्टी यांना दिली आहे.
वस्त्रोद्योग धोरण , सोयाबीन आयात- निर्यात धोरण तसेच साखरेचा बाजारभाव 38 रुपये स्थिर करण्याची मागणी शेट्टींनी गोयल यांच्याकडे केली. राजू शेट्टींनी दिल्लीतील कृषीभवनातील अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयात मंत्री गोयल यांची भेट घेतली. देशातील वस्त्रोद्योग व्यवसायाशी निगडीत अनुदान केंद्र सरकारने बंद केल्याने हा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. वाढलेल्या महागाईमुळे, कच्चा मालातील चढ उतार, वीजेचे वाढलेले दर यामुळे व्यवसायात मंदीचे सावट निर्माण झालेले आहे. तसेच सुत दरातील दैनंदिन होणाऱ्या चढ उतारात सरकारने यार्न बॅंकेच्या संकल्पनेतून नियंत्रण करण्याची गरज असल्याची मागणी शेट्टींनी केली.
खतांचे दर स्थिर राहण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, शेट्टींची मागणी
केंद्र सरकारने अदानी यांच्या कंपन्यांना पामतेल आयात करण्यास परवानगी दिल्याने देशातील सोयाबीनचे दर कोसळू लागल्याचे राजू शेट्टी म्हणाले. यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. याकरता केंद्र सरकारने पामतेल आयातीवर तातडीने आयात शुल्क वाढवण्याची मागणी राजू शेट्टींनी केली आहे. तसेच खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कोलमडत असून खतांचे दर स्थिर राहण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी देखील शेट्टींनी गोयल यांच्याकडे केली.
ऊस उत्पादनात 30 टक्क्यांनी महागाई वाढली
दरम्यान, केंद्र सरकारच्या इथेनॅाल धोरणामुळं साखर उद्योग जरी स्थिरावला असला तरी ऊस उत्पादनात 30 टक्क्यांनी महागाई वाढलेली आहे. केंद्र सरकारनं मात्र एफ.आर.पी मध्ये तीन टक्क्यांनी वाढ केल्यानं देशातील शेतकऱ्यांना यंदा एफ.आर. पी पेक्षा जादा दर शेतकऱ्यांना मिळण्यासाठी बाजारातील साखरेचा दर किमान 38 रुपये स्थिर करण्याची मागणी केली. तसेच गुऱ्हाळघरांचे क्लस्टर करुन त्यांना इथेनॅाल करण्यास परवानगी दिल्यास बाजारांमध्ये गुळाचे दर नियंत्रणात राहून चांगला दर मिळेल असे शेट्टी म्हणाले.
MSP पेक्षा कमी दरानं सोयाबीनची खरेदी
महाराष्ट्रात सोयाबिनची खरेदी एमएसपीपेक्षा कमी दरानं सुरू आहे. अनेक व्यापारी 4 हजार 500 रूपये दराने सोयाबीन खरेदी करत आहेत. सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी गोयल यांच्याकडे केली. यावेळी मंत्री गोयल यांनी नवीन वस्त्रोद्योग धोरणाबरोबर सोयाबीनचे दर किमान सात हजार रुपयांवर स्थिर राहण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. एमएसपी नुसारच सोयाबिनची खरेदी करण्यासाठी योग्य ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या: