CBI Director Appointment : सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआय प्रमुखपदी नियुक्ती
सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन अर्थात सीबीआयच्या संचालकपदी राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार सुबोधकुमार जयस्वाल दोन वर्षे सीबीआय संचालकपदाची धुरा सांभाळतील. सुबोध कुमार जयस्वाल यांच्यासह सशस्त्र सीमा बल (एसएसबी) चे महासंचालक कुमार राजेश चंद्र आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. के. कौमुडी यांची नावं देखील सीबीआय संचालक पदाच्या शर्यतीत होती.
सध्या 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि सीबीआयचे अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा सीबीआय संचालकपदाची सूत्रे सांभाळत आहेत. ऋषीकुमार शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर प्रवीण सिन्हा यांना हा पदभार देण्यात आला होता. दोन वर्षांची मुदत संपल्यानंतर फेब्रुवारीमध्ये संचालक पदावरुन ते निवृत्त झाले होते.
सोमवारी सीबीआय संचालकांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त समितीमध्ये लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आणि मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांचा समावेश होता. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झाली होती.