(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karanj Submarine: 'सायलेंट किलर' पाणबुडी 'आयएनएस करंज' आजपासून नौदलाच्या ताफ्यात
भारतीय सीमांच्या सुरक्षेस धोका वाढत आहे तसं समुद्री सुरक्षा आणखी अभेद्य करण्याची तयारी करण्यात येत आहे.
मुंबई : सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणारी आयएनएस करंज पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. करंज पाणबुडी कोणताही आवाज न करता शत्रूच्या हद्दीत प्रवेश करुन हल्ला करते. करंज पाणबुडीला मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नेव्हल हेडक्वार्टरमध्ये लष्करी परंपरेनुसार युद्धनौकांमध्ये सामील करण्यात आलं. फ्रान्सच्या मदतीने आयएनएस करंजची माजगाव डॉकयार्डने (एमडीएल) निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत स्वदेशी बनावटीच्या सहा पाणबुड्यांची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात येतेय. त्यापैकीच एक असलेली आयएनएस करंज सर्व यशस्वी चाचण्यांनतर आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.
यापूर्वी स्कॉर्पेन क्लासच्या कलवरी आणि खांदेरी देखील युद्धानौकांमध्ये दाखल झाल्या आहेत. तर चौथ्या पाणबुडीच्या उर्वरित समुद्री चाचण्या सुरू आहेत. पाचवी पाणबुडी वागीर देखील लॉन्च करण्यात आली आहे. भारतीय सीमांच्या सुरक्षेस धोका वाढत आहे तसं समुद्री सुरक्षा आणखी अभेद्य करण्याची तयारी करण्यात येत आहे.
Scorpene-class submarine INS Karanj commissioned into Indian Navy in Mumbai, in presence of Chief of Naval Staff Admiral Karambir Singh and Admiral (Retired) VS Shekhawat pic.twitter.com/8Sk520fhzR
— ANI (@ANI) March 10, 2021
आयएनएस करंजची वैशिष्ट्ये
आयएनएस करंज ही कलावारी क्लासची तिसरी पाणबुडी आहे. करंज पाणबुडी 221 फूट लांब, 40 फूट उंच, खोली 19 फूट, 1565 टन वजनाची आहे. यात मशिनरी सेटअप असा करण्यात आला आहे की सुमारे 11 किमी लांबीची पाईप फिटिंग्ज करण्यात आली आहे. अंदाजे 60 किलोमीटरची केबल फिटिंग्ज केली गेली आहेत. स्पेशल स्टीलपासून बनवलेल्या पाणबुडीमध्ये हाय टेंसाईल स्ट्रेंथ आहे, जी खोल पाण्याच्या काम करण्याची क्षमता ठेवते. करंज पाणबुडी 45-50 दिवस पाण्यात राहू शकते. स्टील्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने ही पानबुडी रडारमध्ये येत नाही. कोणत्याही हवामानात काम करण्यास कंरज सक्षम आहे. जास्त काळ प्रवासासाठी आयएनएस करंजमध्ये 360 बॅटरी सेल आहेत. प्रत्येक बॅटरी सेलचे वजन सुमारे 750 किलोग्रॅम आहे. त्यात दोन 1250 किलोवॅट डिझेल इंजिन आहेत. या बॅटरीच्या जोरावर आयएनएस करंज 6500 नॉटिकल माईल्स म्हणजे सुमारे 12000 किमी प्रवास करू शकते. आयएनएस करंज 45-50 दिवसांच्या प्रवासाला जाऊ शकतो.
पाण्यात खोलवर जाऊन शत्रूचा शोध घेते
करंज पाणबुडी 350 मीटर खोलवर जाऊन शत्रूचा शोध घेते. या पानबुडीचा टॉप स्पीड 22 नोट्स आहेत. या पाणबुडीला सायलेंट किलर म्हटलं जातं कारण या एक अॅडव्हान्स शस्त्र आहे जे शत्रूला सळो की पळो करण्यास पुरेस आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मॅग्नेटाइज्ड प्रोपल्शन मोटर, ज्याचे तंत्रज्ञान फ्रान्सकडून घेण्यात आले आहे. यामुळे पानबुडीतून येणारा आवाज बाहेर येत नाही. त्यामुळे शत्रूला या पानबुडीचा शोध घेणे कठीण जाते. आयएनएस करंज दोन पेरिस्कोपसह सुसज्ज आहे. आयएनएस करंजवर 6 टॉरपीडो ट्यूब तयार करण्यात आल्या आहेत. ज्यावरून टॉरपीडोस फायर केले जातात. पाणबुडीतील शस्त्रे आणि सेन्सर हाय टेक्नॉलॉजी कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टमशी जोडलेले आहेत.