(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'माणुसकी नसेल तर तुमची कीर्ती व्यर्थ ठरते...', मणिपूर घटनेप्रकरणी डॉ. आंबेडकरांचा दाखला देत शरद पवारांचा पंतप्रधानांवर निशाणा
Sharad Pawar On Manipur Violence : या प्रसंगी आपण एकत्र येऊन मणिपूरच्या लोकांसाठी न्याय मागितला पाहिजे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Sharad Pawar On Manipur Violence: मणिपूरच्या हिंसाचारादरम्यान दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा दुर्दैवी प्रकार घडल्यानंतर आता त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माणुसकी नसेल तर तुमची कीर्ती व्यर्थ ठरते असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याचा दाखला देत शरद पवारांनी केंद्र सरकारच्या मणिपूर धोरणांवर टीका केली आहे.
मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कोटचा आधार घेत यासंबंधी एक ट्वीट केलं. ते म्हणतात की, माणुसकी नसेल तर तुमची कीर्ती व्यर्थ ठरते... मणिपूरमध्ये महिलांविरोधात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अस्वस्थ वाटत आहे. अशा वेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन मणिपूरमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाने यावर तातडीने पाऊलं उचलून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे.
Without humanity, your glory is worthless.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 20, 2023
- B. R. Ambedkar
Distressing to see disturbing visuals from Manipur specially the atrocities against the women, which is despicable.
It’s time to unite, raise our voices, & demand Justice for the people of #Manipur. Home department…
शरद पवारांनी या आधीही केंद्र सरकारच्या मणिपूर धोरणांवर टीका केली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना पंतप्रधान त्या ठिकाणी जात नाहीत, पण अमेरिकेचा दौरा करतात असं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणतेही पाऊल उचललं नसल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून शरद पवार या हिंसाचारावर सातत्याने आवाज उठवत आहेत.
Manipur Violence Viral Video : काय आहे प्रकरण?
मणिपूर हिंसाचार प्रकरणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवलंय. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही तर संबंधित महिलांवर सामूहिक बलात्कारही करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळलीय. मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किलोमीटरवर कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजीची ही घटना आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला कांगपोकपी पोलिसांनी अटक केलीय. दरम्यान याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करु नका असं आवाहन केंद्र सरकारने केलंय. तसंच जर कुणी व्हिडीओ व्हायरल केला तर त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेशदेखील देण्यात आलेत.
ही बातमी वाचा: