(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Attorney General : केंद्र सरकारची ऑफर मुकुल रोहतगींनी नाकारली, नवे अॅटर्नी जनरल कोण होणार?
Mukul Rohatgi : ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी केंद्र सरकारची ऑफर नाकारली आहे.
Mukul Rohatgi : ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी केंद्र सरकारची ऑफर नाकारली आहे. केंद्र सरकारने रोहतोगी यांनी देशाचे नवे अॅटर्नी जनरल या पदाची ऑफर दिली होती. पण केंद्र सरकारची ही ऑफर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी रविवारी नाकारली आहे. याआधी 2014-17 या काळात रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल हे पद सांभाळलं आहे. त्यानंतर 2017 मध्ये केके वेणुगोपाल यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रोहतगी यांनी केंद्र सरकारची ऑफर नाकारण्याबाबत कोणतेही विशेष कारण नसल्याचं सांगितलं. केंद्र सरकारच्या प्रस्तावावर विचार केला, त्यानंतर प्रस्ताव नाकारला, असे रोहतगी म्हणाले. केके वेणुगोपाल या पदावरून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा रोहतगी यांना या पदाची ऑफर केंद्र सरकारने दिली होती. रोहतगी यांच्याकडेच हे पद येईल अशी खूप चर्चा रंगली होती, पण आता त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे देशाचे नवे अॅटर्नी जनरल कोण होणार? याची चर्चा रंगली आहे.
देशाचे नवे अंँटर्नी जनरल केंद्र सरकारची ऑफर ज्येष्ठ वकील मुकुल रोहोतगी यांनी नाकारली
— Prashant Kadam (@_prashantkadam) September 25, 2022
याआधी 2014-17 या काळात रोहतगींनी हे पद सांभाळलेलं
केके वेणुगोपाल या पदावरून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा रोहतगी यांच्याकडेच हे पद येईल अशी खूप चर्चा होती, पण त्यांनी नकार दिला
सध्याचे अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल (KK Venugopal) यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे. 91 वर्षीय वेणुगोपाल आता या पदावर राहण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारकून नव्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. रोहतगी यांनी नकार दिल्यानंतर या पदावर कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रोहतगी यांनी लढवले अनेक महत्त्वाचे खटले -
2014 मध्ये भाजपनं एकहाती सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुकुल रोहतगी यांची पहिल्या टर्मसाठी अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुकुल रोहतगी हे भारतातील सर्वात प्रख्यात वकिलांपैकी एक आहेत. त्यांनी गुजरात दंगलीसह अनेक महत्त्वाचे खटले लढवले आहेत. गुजरात दंगल प्रकरणाच्या खटल्यात रोहतगी यांनी गुजरात सरकारच्या बाजूनं खटला लढवला होता. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाशी संबंधित खटलाही त्यांनी लढवला होता. अलिकडेच मुकुल रोहती यांनी देशभरात गाजलेल्या मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाचा खटला लढवला होता. या प्रकरणात बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीनं अटक केली होती. या प्रकरणी त्यांनी आर्यन खानची बाजू मांडली होती.
वेणुगोपाल होणार निवृत्त-
2020 मध्ये त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, वेणुगोपाल यांनी त्यांचं वय लक्षात घेऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती सरकारला केली होती. परंतु, सरकारनं वेणुगोपाल यांना पुढील कार्यकाळासाठी काम करण्यास सांगितलं. सरकारच्या विनंतीनंतर वेणुगोपाल यांनी आणखी दोन वर्ष या पदावर राहण्याचं मान्य केलं होतं. दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर वेणुगोपाल यांनी निवृत्त व्हायचा निर्णय घेतलाय.