संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये सोबत; दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र दिसले!
Sanjay Raut And Navneet Rana Ravi Rana : गेल्या महिनाभरात संजय राऊत Sanjay Raut आणि नवनीत राणा Navneet Rana या दोन खासदारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापवलं आहे.
Sanjay Raut And Navneet Rana Ravi Rana Together in Ladakh : गेल्या महिनाभरात संजय राऊत Sanjay Raut आणि नवनीत राणा Navneet Rana या दोन खासदारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापवलं आहे. आपल्या राजकीय विरोधकांवर रोज धडाडणाऱ्या या तोफा आहेत तरी कुठं असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. सध्या मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर असलेले संजय राऊत आणि नवनीत राणा सध्या लडाखच्या सीमेवर आहेत. एरवी एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे हे दोन्ही खासदार संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून लडाखमध्ये आहेत. त्यांच्या वक्तव्यांनी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जरी तापलं असलं तरी लडाखच्या थंड हवेत सध्या दोन्ही खासदारांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात. या दौऱ्याच्या वृत्तांकनासाठी एबीपी माझा थेट लडाखमध्ये पोहोचला. एकाच समितीतून दौरा करताना संजय राऊत आणि नवनीत राणा यांची भेट झालीय का?, राजकीय संघर्षाचे या दौऱ्यात पडसाद उमटलेत का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
एबीपी माझावर संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र आल्याची काही दृश्य समोर आली आहेत. रवी राणा आणि संजय राऊत हे एकत्रित जेवण करताना देखील दृश्यांमध्ये दिसत आहे. तर काही दृश्यांमध्ये ते दोघं काही गप्पा मारतानाही दिसत आहेत.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Nanveet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा मातोश्रीसमोर करण्याचा इशारा दिला होता. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. तसेच राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक देखील झाली. त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले आहेत.
दरम्यान त्या गदारोळात संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून पैसे घेतले होते असा आरोप राऊत यांनी केला होता. जर लकडावालाने मनी लॉन्ड्रिंग केलं आहे आणि त्याचा पैसा अनेक ठिकाणी फिरवला आहे, त्यातला एक लाभार्थी राणा दाम्पत्य आहे. हे पैसे का घेतले? हा तपासाचा भाग आहे, असं राऊत म्हणाले होते.
तर नवनीत राणा यांनी राऊत यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिल्ली पोलिसांकडे केली होती. तसं पत्रही त्यांनी दिलं होतं. राऊत यांनी आपल्याला 420 म्हणत बदनामी केली असल्याचं देखील नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र दिसल्याने चर्चेला ऊत आला आहे.