Agnipath Scheme : अग्निपथ योजनेच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा आक्रमक, आज ठिकठिकाणी करणार आंदोलन
अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. ठिकठिकाणी याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनात आता संयुक्त किसान मोर्चानं देखील एन्ट्री केली आहे.
Samyukta Kisan Morcha Protest : लष्कर भरतीसाठी केंद्र सरकाकडून घोषणा करण्यात आलेल्या नवीन अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. ठिकठिकाणी याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. देशभरातील युवक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात आता संयुक्त किसान मोर्चानं देखील एन्ट्री केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने आता अग्निपथ योजनेच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाचे लोक आज देशाच्या अनेक भागात या योजनेला विरोध करत आंदोलन करणार आहेत.
राजकीय पक्ष देखील अग्निपथ योजनेविरोधात
अग्निपथ योजनेविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला आहे. याविरोधात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. त्यानंतर राजकीय पक्षांनी देखील या योजनेविरोधात आवाज उठवला आहे. आता शेतकरी संघटनांशी संबंधित लोकांनी देखील अग्निपथ योजनेच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. शेतकऱ्यांशी संबंधित संयुक्त किसान मोर्चा आज देशभरात निदर्शने करणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात याच संयुक्त किसान मोर्चानं दिल्लीच्या सिमेवर वर्षभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर हे तिनही कृषी कायदे रद्द करण्यात आलं होते.
संयुक्त किसान मोर्चा अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील जिल्हा आणि तहसील मुख्यालयाच्या बाहेर 20 जूनला आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली होती. हे आंदोलन यशस्वी युवक, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील संयुक्त किसान मोर्चानं केलं आहे. यापूर्वी 30 जून रोजी अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्याची माहिती देण्यात आली होती. दुसरीकडे अग्निपथ योजनेच्या विरोधात विरोधकही एकवटले आहेत. दोन दिवसांपूर्वी पाटण्यात महाआघाडी रस्त्यावर उतरली होती. ही योजना रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनेही हा मुद्दा लावून धरला आहे. जंतरमंतरवर सातत्यानं धरणे आंदोलन सुरु आहे. आता छत्तीसगड काँग्रेसनेही आंदोलनाची तयारी केली आहे. दरम्यान, बिहारमधील सत्ताधारी पक्ष भाजप आणि जेडीयूमध्ये अग्निपथ योजनेवरुन अजूनही वाद सुरुच आहे. अग्निपथ योजनेबाबत जेडीयूच्या भूमिकेवर बिहारचे ऊर्जामंत्री बिजेंद्र यादव म्हणाले, की आमची भाजपसोबत युती आहे. आम्ही गुलामगिरीत नाही. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी अग्निपथ योजनेला विरोध दर्शवला होता. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटनाही घडल्या असल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: