पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी सुरुच असल्यानं संबंध सामान्य होणं कठीण : परराष्ट्रमंत्री जयशंकर
भारताचे पाकिस्तानशी सामान्य व्हिसा संबंध नाहीत आणि ते या प्रकरणात खूप प्रतिबंधित आहेत. पाकिस्तानने भारत आणि अफगाणिस्तान म्हणजेच अफगाणिस्तानातून भारतात येणारा मार्ग खंडित केला आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारने दहशतवाद हे जाहीरपणे स्वीकारलेले धोरण आहे, ज्याला ते योग्य मानतात. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारणे खूप कठीण झाले आहे, असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं. आशिया सोसायटीतर्फे आयोजित एका ऑनलाईन कार्यक्रमास संबोधित करताना ते बोलत होते. फक्त दहशतवादच नाही तर पाकिस्तान भारताबरोबर सामान्य व्यापारही करत नाही. मोस्ट फॅव्हर्ड नेशन्स (एमएफएन) हा दर्जाही दिलेला नाही, असं एस जयशंकर यांनी म्हटलं.
व्हिसा संदर्भात भारताचे पाकिस्तानशी संबंध फार चांगले नाही. या प्रकरणात त्यांच्या खूप अटीशर्ती आहेत. त्यांनी भारत आणि अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तान ते भारता दरम्यानचा संपर्क खंडित केला आहे. शेजारी देश व्हिसा आणि व्यावसायिक संबंध चांगले ठेवतात, तसेच कनेक्टिव्हिटी प्रदान करतात. आणि महत्त्वाचे म्हणजे ते दहशतवादाला चालना देत नाहीत. जोपर्यंत आपण या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आपल्या परराष्ट्र धोरणासाठी या विचित्र शेजारील देशाशी सामान्य संबंध कसे ठेवले जातील. आमच्या परराष्ट्र धोरणासाठी हा कठीण विषय आहे, असं एस जयशंकर यांनी म्हटलं.
जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित राज्यांमध्ये विभाजन झालं, यावर बोलताना जयशंकर म्हणाले की, भारताने बाह्य सीमा बदलल्या नाहीत. आमच्या शेजारील देशांचा यात संबंध नाही, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येक देशाला प्रशासकीय कार्यकक्षा बदलण्याचा अधिकार आहे. चीनसारख्या देशानेही त्यांच्या प्रांतांच्या सीमा बदलल्या आहेत आणि मला विश्वास आहे की इतर बरेच देश असं करतात. जेव्हा तुमची बाह्य सीमा बदलली जाते तेव्हाच शेजारील देशांवर परिणाम होतो, मात्र यामध्ये तसं झालेलं नाही.