G-20 India Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची पंतप्रधान मोदींशी फोनवरुन चर्चा; म्हणाले- G20 परिषदेत...
Vladimir Putin-PM Modi Call: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांतं पंतप्रधान मोदींशी फोनवरुन संभाषण झालं, यावेळी दोघांमध्ये G-20 परिषदेविषयी चर्चा झाली.
![G-20 India Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची पंतप्रधान मोदींशी फोनवरुन चर्चा; म्हणाले- G20 परिषदेत... Russia president vladimir putin holds telephone call with pm modi over g 20 summit in new delhi G-20 India Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची पंतप्रधान मोदींशी फोनवरुन चर्चा; म्हणाले- G20 परिषदेत...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/8ad56e032ec69070656e4b8460f612271693230104001432_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सोमवारी (28 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींशी (PM Modi) फोनवरुन संवाद साधला, यावेळी त्यांनी G20 शिखर परिषदेबाबत (G20 Summit India) चर्चा केली. 'ब्रिक्स' गटाच्या विस्तारासह दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या ब्रिक्स (BRICS) परिषदेत झालेल्या करारांच्या महत्त्वावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
पीएमओनं दिलेल्या माहितीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आणि त्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर प्रगतीचा आढावा घेतला. मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा, लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचा मानस दोन्ही नेत्यांचा आहे. दोन्ही देशांमधील अंतराळ सहकार्य विकसित करण्याबाबतही पुतीन आणि मोदींमध्ये चर्चा झाली.
जी-20 परिषदेसाठी पुतीन भारतात येणार नाहीत
PMO ने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. G-20 परिषदेत रशियाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी रशियन फेडरेशनचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव (Sergey Lavrov) येतील, असं पुतीन म्हणाले. रशियाच्या निर्णयाशी पंतप्रधान मोदींनी सहमती दर्शवली. भारताच्या G20 अध्यक्षतेखालील सर्व उपक्रमांना रशियाने सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे पंतप्रधान मोदींनी आभारही मानले.
दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेलाही गेले नव्हते पुतीन
यापूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितलं होतं की, जी-20 शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी पुतिन वैयक्तिकरित्या नवी दिल्लीला जाणार नाहीत. पुतीन दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेलाही गेले नव्हते. तिथेही त्यांच्या जागी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव सामील झाले होते.
9 आणि 10 सप्टेंबर रोजी परिषदेचं आयोजन
G-20 परिषद ही 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. भारतात तसेच दक्षिण आशियामध्ये होणारी ही पहिली परिषद आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी G-20 परिषदेमध्ये अध्यक्षपद भूषवणार आहेत. या परिषदेसाठी दिल्लीमध्ये तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.
G-20 परिषदेत 40 देश होणार सहभागी
यावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, G-20 परिषदेसाठी भारत तयार असून अनेक देशांचे प्रमुख प्रतिनिधी हे या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीमध्ये येणार आहेत. तसेच 40 देश या G-20 परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून यासंदर्भात माहिती दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आता G-20 परिषदेची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. तसेच भारतात होणाऱ्या या परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)