Baramati Loksabha : बारामतीत विजय शिवतारेंची बंडाळी; फडणवीस, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांची तातडीची बैठक
Baramati Loksabha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित बैठक होणार आहे. आज रात्री बैठक होणार आहे.
Baramati Loksabha : कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच, असा निर्धार व्यक्त केलेल्या माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या बंडाळीने तसेच इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीने टेन्शनमध्ये आले आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित बैठक होणार आहे. आज रात्री बैठक होणार असून या बैठकीमध्ये बारामती लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन पाटलांची नाराजी
बारामतीमध्ये अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी शड्डू ठोकल्यानंतर वातावरण कमालीचे तापलं असून याठिकाणी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे रिंगणात असतील. दोन्ही गटाकडून प्रचार सुद्धा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान इंदापूरमध्ये झालेल्या मेळाव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी घणाघाती टीका केली होती. या टीकेचा व्हिडिओ हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकित पाटील यांनी तो व्हिडिओ शेअर करत जैसी करनी वैसी भरणे म्हणत अजित पवार समर्थक आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर तोफ डागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
पवारांनी आमच्यावर अन्याय केला
दरम्यान विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर घणाघाती प्रहार केला. रावण, कपटी अशा शेलक्या शब्दांचा वापर करत मी आमदारकी लढण्यासाठी इथं आलो तेव्हा तरुणांनी माझी निवडणूक हातात घेतली होती, असे ते म्हणाले. मोठे राजकीय पुढारी सांगत होते की मी काय करणार पण आमदार झालो. 25 हजार मतांनी जिंकलो. सगळ्या लोकांनी विश्वास दाखवला. सगळे म्हणायचे की विजय शिवतारे म्हणजे शेंबडाची लढाई असल्याचे म्हणत होते. मात्र, संपूर्ण राज्यातून मला फोन येत आहेत. राष्ट्रवादीमधून संभ्रम पसरवला जात असून पण मी असा नालायकपणा करणार नसल्याचे म्हणाले.
पवारांची हुकूमशाही संपवण्यासाठी हे माझे धर्मयुद्ध
राज्यांमध्ये राजकीय चिखल झाला असून मी नवीन पर्याय आणि नवीन पर्वासह आणि पवार पर्व संपवण्यासाठी लढत असल्याचे विजय शिवतारे म्हणाले. पवारांनी आमच्यावर अन्याय केला असून ही लढाई जिंकण्यासाठी लढत असल्याचेही ते म्हणाले. पवारांची हुकूमशाही संपवण्यासाठी हे माझे धर्मयुद्ध असून कोणत्याही परिस्थितीत माघार नको, असे लोक मला सांगत आहेत. ही निवडणूक मी लढणारच असून जनतेचा आशीर्वाद मला असल्याचं विजय शिवतारे म्हणाले.
सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सभा घेणार असल्याचे विजय शिवतारे म्हणाले. लोकांना आज आमंत्रित करत आहे, 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरून यांचे 12 वाजणार असल्याचे शिवतारे म्हणाले. रोडशो सुद्धा करणार असल्याचे शिवतारेंनी सांगितले. 4 जून रोजी जनशक्तीची भावना काय असतील हे दाखवून देईन असे विजय शिवतारे यांनी सांगितले. राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण दहशतवाद पेरताना सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या