(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress Rajya Sabha Candidates : राज्यसभा उमेदवारांबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम, 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा
काँग्रेसमध्ये राज्यसभा उमेदवारांबाबतचा सस्पेन्स कायम आहे. राज्यसभा उमेवार कोण याबद्दल राजकीय वर्तळात अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये अद्याप उमेदवारांबाबतचा सस्पेन्स कायम आहे. राज्यसभा उमेवार कोण याबद्दल राजकीय वर्तळात अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. एकीकडे कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असताना, काँग्रेसने अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यापर्यंत काँग्रेस अंतिम उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (Former Union Minister Jairam Ramesh)यांच्या नावावर औपचारिक निर्णय घेण्यात आला असून, त्यांना राज्यातून राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयाची माहिती कर्नाटक युनिटला देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित नावांवर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
या काँग्रेस नेत्यांच्या नावांची चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, पक्षाचे सरचिटणीस अजय माकन, सरचिटणीस आणि मीडिया प्रभारी रणदीप सुरजेवाला, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राजस्थानचे माजी खासदार भंवर जितेंद्र सिंह, माजी खासदार बद्री राम जाखड, कुलदीप बिश्नोई, अजित कुमार, सुबोध कांत सहाय या नेत्यांच्या नावांची राज्यसभेसाठी चर्चा सुरु आहे. यामध्ये आता कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची संजय निरुपम यांनी घेतली भेट
दरम्यान, काँग्रेसने अद्याप महाराष्ट्रातूनही उमेदवार निश्चित केलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, अविनाश पांडे, गुलाम नबी आझाद, मिलिंद देवरा यापैकी कोणालाही उमेदवारी दिली जाऊ शकते. या सर्व नावांची चर्चा सुरु असतानाच संजय निरुपम यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे संजय निरुपम यांचे देखील नाव चर्चेत आले आहे.
G23 मध्ये सहभागी असलेले गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा या दोघांनाही पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सपाला पाठिंबा दिला. त्याचा परिणाम उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर होऊ शकतो. त्याचबरोबर राजस्थानमधून गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या विचाराने राजस्थान काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे.
कोणत्या राज्यातून किती जागा?
सध्याच्या गणितानुसार काँग्रेसला राजस्थानमधून तीन, छत्तीसगडमधून दोन, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येकी एक जागा मिळू शकते. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक आणि झारखंडमधील जेएमएमने प्रत्येकी एक जागा दिल्यास काँग्रेसला आणखी दोन जागा मिळू शकतात.
महत्वाच्या बातम्या: