Rajasthan : सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सना 5 लाखांपर्यंत मिळणार जाहिरात; राजस्थान सरकारची मोठी घोषणा
Rajasthan News : राजस्थान सरकारने राज्यातील सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सना 5 लाख रुपयांपर्यंतच्या जाहिराती देण्याची घोषणा केली आहे.
Rajasthan News : तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय (Active) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या सरकारने राज्यातील सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सना 5 लाख रुपयांपर्यंतच्या जाहिराती देण्याची घोषणा केली आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाने (DIPR) जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबवर 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या कोणालाही 10,000 रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत दरमहा जाहिराती मिळू शकतात.
10 हजारांहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
अधिका-यांनी सांगितल्यानुसार, DIPR लवकरच अशा प्रभावशाली लोकांचे एक पॅनेल तयार करणार आहे. त्यानंतर एक-दोन आठवड्यात संपूर्ण प्रक्रिया सुरू होईल. DIPR ने फॉलोअर्सच्या संख्येवर आधारित इन्फ्लुएन्सर्ससाठी चार कॅटेगरी तयार केल्या आहेत. यामध्ये फॉलोअर्सचा मागच्या सहा महिन्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार आहे. या संदर्भात इन्फ्लुएंसरचे सीईओ भूपेंद्र सिंह म्हणाले की, कंपनीचे अधिकृत विधान आहे की पुढील निवडणूक सोशल मीडियाच्या माध्यमातून पार पडणार आहे.
राजस्थान सरकार 10 हजार ते 5 लाखांची जाहिरात देणार
या संपूर्ण प्रकरणा संदर्भात भूपेंद्र सिंह म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची ही काही नवीन घटना नाही. या आधीही 2014 आणि 2019 च्या निवडणुका सोशल मीडियाच्या माध्यमातून लढवल्या गेल्या होत्या. त्यानुसार आता 2024 मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स महत्त्वाची भूमिका बजावतील. भूपेंद्र सिंह म्हणाले की, पूर्वीच्या राजकीय पक्षांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी, तसेच खेळाडूंच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला जायचा. हीच गोष्ट आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही लागू होणार आहे. याचं मुख्य कारण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे फॉलोअर्स आणि त्यांचा प्रेक्षकवर्ग आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारची योजना
भूपेंद्र सिंह म्हणाले की, केवळ राजस्थानमधील काँग्रेस सरकारच नाही तर भाजपही मोठ्या संख्येने ऑनलाईन फॉलोअर्स आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. विनोदवीर, भजन गायक, फूड व्लॉगर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांना आकर्षित करण्याची सरकारची योजना आहे. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत बढती मिळवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
...यासाठी सरकारने उचलले हे पाऊल
भूपेंद्र सिंह म्हणाले की, आज प्रत्येक पक्षाला सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सर्सशी जोडून घ्यायचे आहे. याचं मुख्य कारण बहुतेक म्हणजे तरुण लोक आता टीव्ही चॅनेलऐवजी सोशल मीडियावर रील्स किंवा यूट्यूब व्हिडिओ किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिक वेळ घालवणं पसंत करतात. पुढे सिंह म्हणाले, राजकीय पक्षांना या इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत विशेषत: तरुण लोकसंख्येपर्यंत पोहोचायचे आहे. भूपेंद्र सिंह म्हणाले की, भारतात 24 कोटींहून अधिक लोक इंस्टाग्राम वापरतात आणि 25.2 कोटींहून अधिक लोक यूट्यूबचा वापर करतात. एक सामान्य नागरिक दररोज सोशल मीडियावर सरासरी 2.36 तास घालवतो. आणि कमी वेळात जास्तीत जास्त लोकापंर्यंत पोहोचण्याचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हा सर्वोत्तम मार्ग आहे असेही ते म्हणाले.
इन्फ्लुएन्सर्ससाठी 'या' आहेत चार कॅटेगरी
दरमहा किमान 10 लाख आणि कमाल 5 लाखांची जाहिरात
5 लाखांवर फॉलोअर्स असणाऱ्यांसाठी 2 लाखांची जाहिरात
1 लाखांवर फॉलोअर्स असणाऱ्यांसाठी 50 हजारांची जाहिरात
10 हजारांवर फॉलोअर्स असणाऱ्यांसाठी 10 हजारांची जाहिरात