एक्स्प्लोर
राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तर्कवितर्क
महाराष्ट्रात काँग्रेसच्या कोणत्या नेत्याशी चर्चा करावी, हा प्रश्न राज ठाकरेंनी निकालात काढल्याचं दिसलं. थेट काँग्रेस हायकमांडशी राज ठाकरेंनी चर्चा केल्यामुळे या भेटीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. देशामध्ये जी सध्या परिस्थिती आहे त्याला निवडणुकीतून नव्हे, तर आंदोलनातून उत्तर देण्याची गरज असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी चर्चेत मांडली.
यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी करण्यासाठी राज ठाकरे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला दिल्लीत गेले होते. याच दौऱ्यात राज ठाकरेंनी सोनिया गांधींची 10, जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसच्या कोणत्या नेत्याशी चर्चा करावी, हा प्रश्न राज ठाकरेंनी निकालात काढल्याचं दिसलं. थेट काँग्रेस हायकमांडशी राज ठाकरेंनी चर्चा केल्यामुळे या भेटीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या वाटाघाटी झाल्या, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपविरोधी प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसची मदतच केली होती. मात्र राष्ट्रवादी अनुकूल असतानाही काँग्रेसने मनसेला सोबत घेणं टाळलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत झाली होती. त्यामुळे आता तरी काँग्रेस राज ठाकरेंना टाळी देणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
काँग्रेस शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र, या तत्त्वाला अनुसरुन आता काँग्रेस मनसेची साथ घेणार का, याबाबत राजकीय तर्कवितर्कांना ऊत आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या करिष्म्याचा फायदा काँग्रेस करुन घेणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
राज ठाकरे यांचं नेतृत्व तरुणांमध्ये लोकप्रिय आहे, त्यांची भाषणशैली प्रभावी आहे. या गोष्टीचा फायदा करत काँग्रेस भाजपला मात देणार का, नवी राजकीय समीकरणं जन्माला येणार का, याबाबत महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणात उत्सुकता आहे.
यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही दिल्लीत भेट झाली होती. त्या भेटीमागील कारणं वेगळी असली, तरी राज ठाकरे आणि सोनिया गांधी या त्यांच्या पुढच्या पिढीतील नेत्यांची भेट गांधी आणि ठाकरे घराण्याच्या भेटीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणारी ठरत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement