रेल्वेकडून मोफत विमा बंद, प्रवाशांकडून प्रीमियम
रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंग सिस्टममध्ये प्रवाशांना मोफत अपघात विमा देण्याची योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमा काढायचा की नाही हे प्रवाशाच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने अपघात विम्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंग सिस्टममध्ये प्रवाशांना मोफत अपघात विमा देण्याची योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नोटबंदीच्या आधी या विम्यासाठी 92 पैसे शुल्क आकारण्यात येत होतं.
मात्र नोटाबंदीच्या काळात ऑनलाईन तिकीटांची विक्री वाढण्यासाठी सर्व ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना मोफत विमा देण्यात येत होता आणि आजही मिळत आहे.
सप्टेंबर महिन्यापासून मोफत विमा मिळणे बंद होणार आहे. विमा काढायचा की नाही हे प्रवाशाच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे. ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना दोन पर्याय दिले जाणार आहे. प्रवाशाला विम्याची सुविधा हवी असेल तर अधिकचं विमा शुल्क प्रवाशाला भरावं लागणार आहे. मात्र विम्यासाठी किती पैसे आकारले जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. विमा कंपन्यांसोबत यासंबंधीच्या टेंडरची प्रक्रिया सुरू आहे. तीन कंपन्यांना हे टेंडर दिलं जातं.
रेल्वेच्या या योजनेअंतर्गत अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास प्रवाशाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत रेल्वेकडून दिली जात असे. तर अपघातामुळे अंपगत्व आल्यास प्रवाशाला मदत म्हणून साडे सात लाख रुपये दिले जात आहेत. तसेच जखमींना 10 हजार रुपयांपर्यंतची मदत या विम्यातून प्रवाशांना मिळत आहे.























