Rabindranath Tagore : रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी
Rabindranath Tagore Birth Anniversary : आज रवींद्रनाथ टागोर यांची 162 वी जयंती आहे.
Rabindranath Tagore Birth Anniversary 2023 : रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) हे जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक होते. ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते. आज रवींद्रनाथ टागोर यांची 162 वी जयंती आहे. ते एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य आणि संगीतात आमूलाग्र बदल घडून आला.
भारताच्या इतिहासात रवींद्रनाथ टागोरांचे योगदान महत्वपूर्ण आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी.
- रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी बंगालमधील जोजासांको या ठिकाणी झाला. रवींद्रनाथ टागोरांनी भारताच्या आणि बांग्लादेशच्या राष्ट्रगीताची निर्मिती केली. त्यांनी कला, साहित्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं.
- भारत आणि बांग्लादेश या दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर हे जगातले एकमेव कवी आहेत.
- रविंद्रनाथांनी वयाच्या आठव्या वर्षी आपले पहिले काव्य लिहिलं होतं तर 16 व्या वर्षी त्यांची पहिली लघुकथा प्रकाशित झाली होती.
- रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्यामध्ये दोन हजारांहून अधिक रचना केल्या आहेत. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात आपलं योगदान दिलं.
- 'गीतांजली' या काव्यरचनेसाठी 1913 साली त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. साहित्याचा नोबेल मिळवणारे ते आशियातील पहिले व्यक्ती होते.
- विद्यार्थ्यांनी शाळेच्या चार भिंतींच्या बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घेतलं पाहिजे या विचारातून त्यांनी शांतिनिकेतनची सुरुवात केली.
- रवींद्रनाथ टागोर हे नावाजलेले चित्रकारही होते. त्यांनी या क्षेत्रात अनेक प्रसिद्ध कलाकृतींची निर्मिती केली आहे.
- रवींद्रनाथ टागोर यांचे विचार राष्ट्रवादी आणि मानवतावादी होते. त्यांनी त्यासाठी शेवटपर्यंत काम केलं.
- रवींद्रनाथ टागोर यांना ब्रिटिश सरकारने 'सर' ही पदवी दिली होती. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी ती परत केली.
महात्मा गांधी यांना रवींद्रनाथ टागोरांबद्दल प्रचंड आदर होता. त्यांनीच टागोर यांना 'गुरूदेव' अशी उपाधी दिली होती. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला, नृत्य, शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या आणि दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते.