CM Amarinder Singh Resigns: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
सरकार चालवण्यासंदर्भात माझ्यावर संशय निर्माण करण्यात आला आहे. माझा अपमान करण्यात आला, असं अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटलं आहे.
CM Amarinder Singh Resigns: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जात त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा देण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कल्पना दिली असल्याची माहितीही अमरिंदर सिंह यांनी दिली.
राजीनमा अमरिंदर सिंह यांनी म्हटलं की, ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्री बनवावं. सरकार चालवण्यासंदर्भात माझ्यावर संशय निर्माण करण्यात आला आहे. माझा अपमान करण्यात आला. मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे. सकाळी मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनाम्यासंदर्भात माहिती दिली होती. मला सर्व रस्ते खुले आहेत. सर्व पर्यायांवर विचार केला जाईल. समर्थकांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल असं, अमरिंदर सिंह यांनी म्हटलं.
My father submitting his resignation to HE the Governor Sahib of Punjab. pic.twitter.com/RyINJSUeh5
— Raninder Singh (@RaninderSingh) September 18, 2021
राजीनाम देण्यापूर्वी अमरिंदर सिंह यांनी आपल्या बाजूने असलेल्या आमदारांसोबत बैठक घेतली. चंढिगड येथील त्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. त्यानंतर अमरिंदर सिंह यांनी राज्यपालांकडे आपल्या राजीनामा सुपूर्द केला.
पंजाबमध्ये आज होणारी आमदारांची बैठक ही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासाठी अडचणीची ठरु शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहणं बंधनकारक आहे असा आदेश पक्षाकडून देण्यात आला होता. जवळपास 40 हून अधिक नाराज आमदारांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पदावरुन हटवावं अशी भूमिका घेत हायकमांडला पत्र लिहिलं होतं. त्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पंजाबच्या नेतृत्वात बदल करणार असल्याची चर्चा आधीपासून सुरु होती.
पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यातील आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला.