PM Modi On Rahul Gandhi : 'जशी अहंकाराने लंका जाळली होती तशीच त्यांची स्थिती झाली आहे', लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर घणाघात
No Confidence Motion Debate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वासाच्या प्रस्तावावर लोकसभेत विरोधकांना चोख उत्तर दिलं आहे.
PM Modi On Rahul Gandhi : लोकसभेत अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज उत्तर दिले. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणामध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधाला. जसं एचएएलच्या कारखान्याजवळ व्हिडिओशूट केलं होतं तसंच आता शेतात जाऊन व्हिडिओ शूट केलं जात आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच नाव न घेता त्यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विषयी त्यांनी बऱ्याचदा वाईट शब्दांत टीका केली आहे. जसं त्यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या बाहेर व्हिडिओ शूट केलं होतं तसचं ते हल्ली शेतात जाऊन व्हिडिओ शूट करत आहेत. तेव्हा त्यांनी कामगारांना भडकवण्याचं देखील काम केलं होतं. पण त्यांच्याच आशीर्वादाने आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यशस्वी वाटचाल करत आहे.'
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'लंका ही हनुमानाने नाही तर अहंकाराने जाळली होती. तसंच सध्या त्याचं सुरु आहेत. त्यामुळे ते 400 जागांवरुन 40 जागांवर आले आहेत.' राहुल गांधी हे काही दिवसांपूर्वी हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते. तेव्हा त्यांनी त्या शेतकऱ्यांसोबत शेती करत त्यांच्यासोबत संवाद साधला. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांच्या याच व्हिडिओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीकास्र सोडलं आहे.
'जे कधी लोकांमध्ये गेलेच नाहीत त्यांना...'
जे कधी लोकांमध्ये गेलेच नाहीत त्यांना शेतात बघून लोकांना आश्चर्यच वाटणार आहे. जेव्हा अशी लोकं भारताच्या स्थितीचं वर्णन करतात तेव्हा ते विसरुन जातात की त्यांच्या घराने 50 वर्ष देशावर राज्य केलं होतं. यांची डाळ काही केल्या शिजत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस ते नवीन दुकानं उघत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
आता त्यांना चोवीस तास मोदींचं स्वप्न येतं - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांना सध्या चोवीस तास मोदींचं स्वप्न पडत आहे. मोदींनी पाणी जरी पिलं तरी ते म्हणतात मी त्यांना पाणी पाजलं. लोकांशी संवाद साधताना घाम आला तर ते म्हणतात की माझ्यामुळे त्यांना घाम आला.
राहुल गांधींना काय म्हटलं ?
लोकसभेत राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरंल होतं. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान म्हटलं होतं की, यांच्या राजकारणाने मणिपूरला नाही हिंदुस्तानाला मारलं आहे. तसेच पंतप्रधान आजपर्यंत मणिपूरमध्ये का गेले नाहीत असा सवाल देखील त्यांनी या माध्यमातून उपस्थित केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर देत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी तीन उदाहरणं देत राहुल गांधी यांच्या टीकास्र सोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँका, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि एलआयसी अशी तीन वेगवेगळी उदारणं देत काँग्रेसचं अपयश स्पष्ट केलं आहे.