Presidential Election 2022 : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि निवडणुकीचे 'गुजरात कनेक्शन'
Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करुन भाजपने आगामी गुजरात निवडणुकीमध्ये फायदा करुन घेण्याची रणनीती आखली आहे.
नवी दिल्ली: येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून 21 जुलै रोजी देशाला नवा राष्ट्रपती मिळणार. एनडीएच्या वतीने या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. त्या जर निवडून आल्या तर देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार आहे. पण त्याचा फायदा भाजपला गुजरातच्या आगामी निवडणुकीसाठी होणार आहे.
भाजपला याचा फायदा कसा?
1. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या जागांवर भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे.
2. यामध्ये भाजपला काही पक्षांचा पाठिंबा मिळणार आहे.
3. भाजपला अनुसूचित जमातीचा पाठिंबा मिळणार.
4. द्रौपदी मुर्मू जिंकल्यास भाजप या सर्व जागा जिकू शकते.
भारतातील अनुसूचित जमातीची संख्या
भारतात अनुसूचित जमातीची एकूण संख्या 10.45 कोटी इतकी आहे. भारतात एक कोटीहून जास्त अनुसूचित जमातीची संख्या असणारे सहा राज्ये आहेत. त्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, गुजरात, झारखंड या राज्यांचा समावेश होते. तसेच छत्तीसगड (31 टक्के), झारखंड (26 टक्के), ओडिशा (23 टक्के), मध्य प्रदेश (21 टक्के) आणि गुजरात (15 टक्के) या राज्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.
गुजरातमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या
गुजरातमध्ये देशातील एकूण अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येपैकी 8 टक्के लोकसंख्या राहते. तर राज्यातील 15 टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची आहे. आकड्यात सांगायचं तर गुजरातमध्ये 89.17 लाख इतकी आहे. एकूण 14 जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातीचे प्राबल्य आहे. त्यामध्ये पूर्व गुजरातमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनुसूचित जमातीमधील 11 जमातीपैकी भिल जमातीची लोकसंख्या ही सर्वाधिक असून ती 47.89 टक्के इतकी आहे, म्हणजे 43 लाख इतकी आहे.
भाजप आणि मोदींसाठी गुजरात का महत्त्वाची आहे?
भाजपचे लोकसभा निवडणुकीतील मतांचे प्रमाण
2019- 26 जागा, 63 टक्के
2014- 26 जागा- 60 टक्के
2009- 15 जागा- 46.5 टक्के
2004- 14 जागा- 47.4 टक्के
विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या जागा
1995- 121 जागा
1998- 117 जागा
2002- 127 जागा
2007- 117 जागा
2012- 115 जागा
2017- 99 जागा
या आकडेवारीतून स्पष्ट होतंय की भाजपच्या जागा या सातत्याने कमी कमी होत आहेत. त्यातही अनुसूचित जमातीचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी भाजपला कमी प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या भागात भाजपला आपली ताकत वाढवायची आहे. 2017 साली भाजपला अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या जागांपैकी 9 जागा मिळाल्या होत्या भाजपला 15 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपने या ठिकाणी आता लक्ष्य केंद्रीत केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोदींनी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं जातंय.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. त्या झारखंडच्या नवव्या राज्यापल देखील होत्या. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या ओदिशाच्या पहिल्या नेत्या आहेत, ज्या राज्यपाल बनल्या आहेत. याआधी BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 पर्यंत त्या मंत्री देखील होत्या.
देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता
देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती.