Presidential Election 2022 : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकीला आठवडाभरात तिसरा धक्का!
Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गेल्या आठवडाभरात विरोधकांच्या एकीला मोठे धक्के बसलेत. त्यामुळे एनडीएचा विजय अगदीच सुकर झाल्याचं दिसत आहे.
Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान होणार आहे. एनडीएकडून द्रोपदी मुर्मु तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा हे रिंगणात आहेत. पण गेल्या आठवडाभरात विरोधकांच्या एकीला मोठे धक्के बसलेत. त्यामुळे एनडीएचा विजय अगदीच सुकर झाल्याचं दिसत आहे.
राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांच्या एकीला एकापाठोपाठ एक सुरुंग लागत चालले आहेत. गेल्या आठवडाभरात तब्बल तीन पक्षांनी यूपीए मित्र पक्षांची साथ देत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आधी शिवसेना नंतर झारखंड मुक्ती मोर्चा आणि आज ओम प्रकाश राजभर हे तीन पक्ष एनडीएच्या साथीला आले आहेत.
राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर होण्याआधी 2017 पेक्षा यावेळची निवडणूक भाजपसाठी जड असेल असं मानलं जात होतं. जवळपास 26 हजार मतं कमी पडत होती. पण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मु यांचं नाव एनडीएनं जाहीर केलं आणि पारडं फिरलं. कारण आदिवासी आणि त्यातही महिला उमेदवाराला विरोध करणं अनेक पक्षांसासाठी अडचणीचं ठरलं.
खरंतर विजयासाठी कमी असलेल्या मतांची भाजपनं लगेचच गोळाबेरीज केली होती. वायएसआरचे जगनमोहन रेड्डी, बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक या दोघांच्याच पाठिब्यानं भाजपची चिंता दूर केली होती. पण सोबत इतर पक्षही जुळत चालल्यानं विरोधकांच्या एकीला सुरुंग लावण्यातही भाजप यशस्वी ठरत आहे. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासाठी मुंबईत होणारी महाविकास आघाडीची बैठक तर रद्द करावी लागली.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकीला सुरुंग
शिवसेनेचा पाठिंबा- महाराष्ट्रातल्या सत्तांतराचा परिणाम शिवसेनेच्या भूमिकेवर. 21 खासदार, 55 आमदार असलेल्या शिवसेनेकडे सर्वात मोठा कोटा..पण 40 आमदार फुटले, त्यानंतर खासदारांचाही दबाव वाढला त्यामुळे उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला
झारखंड मुक्ती मोर्चाचा पाठिंबा- झारखंड मध्ये हेमंत सोरेन आणि काँग्रेस दोघे एकत्रित सरकारमध्ये आहेत. पण झारखंड हा आदिवासी बहुल प्रदेश..त्यात हेमंत सोरन यांचा पक्ष याच वर्गाचं प्रतिनिधीत्व करणारा. त्यामुळे यशवंत सिन्हा हे झारखंडचे असूनही सोरेन यांनी मात्र आदिवासी द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा दिला
ओमप्रकाश राजभर- उत्तर प्रदेशातल्या सुहैलदेव समाज पक्षाचे ओमप्रकाश राजभर हे अखिलेश यादव यांच्यासोबत एकत्रित निवडणुक लढले होते. पण आज त्यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
त्यामुळे आता राष्ट्रपती निवडणुकीत केवळ एनडीएच्या विजयाची औपचारिकताच बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही. ही निवडणूक म्हणजे 2024 च्या दृष्टीनं विरोधकांच्या एकीची परीक्षा असणार होती. पण त्यात तूर्तास तरी विरोधक पूर्णपणे अयशस्वी झाल्याचं चित्र दिसतंय.