खासदार ते राष्ट्रपती : प्रणव मुखर्जी यांचा राजकीय प्रवास
उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेले प्रणवदा काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. त्यांनी काँग्रेसचे ससंदीय दल नेते, काँग्रेस आमदार, खासदारांचे नेते म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना जन्म 11 डिसेंबर 1935 ला पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील किरनाहरजवळील मिराती गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाम कामदा किंकर मुखर्जी आणि आईचं नाव राजलक्ष्मी मुखर्जी. सूरी विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. हिस्ट्री आणि पॉलिटिक्समध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी लॉ ची पदवी प्राप्त केली. सुरुवातीला त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर बांग्ला प्रकाशन संस्थेच्या देशेर डाकसाठी काही काळ पत्रकारिताही केली. बंगिय साहित्य परिषदेचे ट्रस्टी आणि अखिल भारत बंग साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले आहे.
त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. त्यांनी दहा वर्षांचा तुरुंगवासही भोगला होता काँग्रसचे सक्रिय सदस्य होते आणि पश्चिम बंगाल विधान परिषदेत 1952 ते 1964 पर्यंत काँग्रेसचे सदस्य होते. 1985 नंतर त्यांच्यावर पश्चिम बंगालच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेले प्रणवदा काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. त्यांनी काँग्रेसचे ससंदीय दल नेते, काँग्रेस आमदार, खासदारांचे नेते म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. लोकसभेत काँग्रेस पक्षाते नेते म्हणूनही त्यांनी काम केलेय. संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, परिवहन, संचार, वाणिज्य उद्योग आदि मंत्रीपदेही भूषवली आहेत.जवळ-जवळ पाच दशकं ते राजकारणात सक्रिय होते.
सर्वप्रथम 1969 मध्ये काँग्रेसकडून त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून संसदेत पाठवण्यात आलं. त्यानंतर 1975, 1981, 1993 आणि 1999 मध्ये ते पुन्हा निवडले गेले होते. 1973 मध्ये सर्वप्रथम औद्योगिक विकास विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. 1984 मध्ये त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपवण्यात आलं. यूरोमनी मासिकानं केलेल्या सर्वेक्षणात जगातील सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री म्हणून प्रणव मुखर्जी यांची निवड झाली होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. तेव्हा राजीव गांधी यांच्या निकटवर्तियांनी प्रणव मुखर्जी यांचा पत्ता कापला होता. यामुळं नाराज झालेल्या प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती. मात्र 1989 मध्ये राजीव गांधींशी चर्चा करून त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. नरसिंहराव मंत्रिमंडळात त्यांनी विदेश मंत्री म्हणून काम केले. 1997 मध्ये सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. 1998 मध्ये रिडिफला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भ्रष्टाचारात सर्वच राजकीय पक्ष सामिल असतात त्यात काँग्रेसही आहे असे त्यांनी म्हणत खळबळ उडवली होती.
सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळच्या नेत्यांपैकी ते एक होते. त्यामुळेच 2004 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी त्यांच्यावर संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2007 मध्ये त्यांना पद्म विभूषण दिलं गेलं होतं. 26 जानेवारी 2019 ला भारत रत्न पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं होतं. 25 जुलै 2012 रोजी त्यांनी देशाचे तेरावे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.
प्रणव मुखर्जी यांनी द कोलिएशन इयर्स, द ड्रमॅटिक डिकेड, द टर्ब्युलनट इयर्स आणि थॉट्स अँड रिफ्लेक्शन्स अशी पुस्तकही लिहिली आहेत.13 जुलै 1957 ला शुभ्रा मुखर्जीसोबत त्याचं लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. वाचन, बागकाम आणि संगीत ऐकणे हे त्यांचे छंद होते.
संबंधित बातम्या :