(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चेक पेमेंट सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व बँकेचं पाऊल, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार
फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआय 1 जानेवारी 2021 पासून चेकसाठी Positive Pay System सुरु करणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने फसवणूक रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) सुरु करणार असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया...
पॉझिटिव्ह पे सिस्टमअंतर्गत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी महत्त्वाच्या माहितीबाबतीत पुन्हा एकदा पुष्टी करण्याची गरज भासणार आहे. या सिस्टममध्ये चेक देणाऱ्याला एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम यांसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकबाबत आणखी माहिती द्यावी लागणार आहे.
यामध्ये तारीख, लाभार्थींचं नाव, प्राप्तकर्ता (पेई) आणि रकमेबाबत माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती असलेला चेक पेमेंटसाठी देण्याआधी पहिल्यांदा पडताळला जाईल. जर कोणत्या विसंगती आढळल्या, तर त्याची माहिती पेमेंट करणारी बँक आणि प्रस्तुत करणाऱ्या बँकेला दिली जाईल आणि त्यामधील त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी पावलं उचलली जातील. आरबीआच्या माहितीनुसार, या सुविधेचा फायदा घेण्याचं खातेधारकावर अवलंबून आहे. बँक 5 लाख रुपये आणि त्यावरील जास्त रक्कम असणाऱ्यांसाठी ही सिस्टम अनिवार्य करु शकतात.
रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे की ही सिस्टम 1 जानेवारी 2021 पासून लागू होईल. ग्राहकांनी जागरुक राहावं असं बँकांनी एसएमएसद्वारे सांगितलं आहे. यासोबतच बँक आपल्या शाखांमधअये, एटीएमसोबतच वेबसाईट आणि इंटरनेट बँकिंगवर याबाबत संपूर्ण माहिती देईल.