मित्रों की मेरे प्यारे देशवासियों..... पंतप्रधान मोदी भाषणाची सुरुवात कशी करणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. खरंतर मोदी संबोधित करणार म्हटल्यावर ते काय बोलणार याची उत्सुकता कायमच असते. इतकंच काय मोदी भाषणाची सुरुवात मित्रों शब्दाने करतात की मेरे प्यारे देशवासियों यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 जून) देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी दुपारी चार वाजता संबोधित करतील. कोरोना काळातील पंतप्रधानांचं देशाला उद्देशून हे सहावं संबोधन असेल. पंतप्रधान आपल्या भाषणात कोणत्या मुद्द्यावर भर देणार आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु कोरोना महामारीशी संबंधित मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे. मात्र सोबतच भारत-चीन तणाव या मुद्द्यांवर ते भाष्य करु शकतात.
कोरोना काळातील आतापर्यंतचे संबोधन
19 मार्च - पहिल्या संबोधनात जनता कर्फ्यूची घोषणा कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 मार्च 2020 रोजी रात्री आठ वाजता पहिल्यांदा देशाला संबोधित केलं होतं. या पहिल्या संबोधनात मोदींनी देशवासियांना एकजूट होऊन कोरोनाचा सामना करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर काळजी घेण्याचं सांगत 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. यादरम्यान लोकांनी संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी घराच्या बाल्कनीत किंवा दारात उभं राहून फ्रण्ट लाईनवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी शंख, टाळ्या, थाळ्या किंवा घंटी वाजवण्यास सांगितलं होतं.
24 मार्च - दुसऱ्या संबोधनात 21 दिवसांचा लॉकडाऊन जनता कर्फ्यू यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी 24 मार्चच्या रात्री आठ वाजता देशाला दुसऱ्यांदा संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं सांगत संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती.
3 एप्रिल - तिसऱ्या संबोधनात दिवा लावण्याचं आवाहन लॉकडाऊन-1 दरम्यान कोरोना योद्ध्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेश जारी करुन तिसऱ्यांदा देशाला संबोधलं होतं. यावेळी त्यांनी देशवासियांना 5 एप्रिलच्या रात्री नऊ वाजता देशासाठी नऊ मिनिटं वेळ काढण्याचं आवाहन केलं होतं. यादरम्यान घरातील लाईट बंद करुन आपापल्या बाल्कनीत, दरवाजांमध्ये आणि घराबाहेर दिवे, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट लावण्याचं आवाहन केलं होतं.
14 एप्रिल - चौथ्या संबोधनात लॉकडाऊन-2 ची घोषणा लॉकडाउन-1 संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 14 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी चौथ्यांदा देशवासियांना संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लोकांना सहकार्याचं आवाहन करत 3 मेपर्यंत देशात लॉकडाऊन-2 लागू करण्याची घोषणा केली होती. यानंतरचे सगळे लॉकडाऊन गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले.
12 मे - पाचव्या संबोधनात आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा पंतप्रधान मोदींनी 12 मे रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केलं होतं, ज्यात त्यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली होती. या अंतर्गत त्यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजही जाहीर केलं होतं. देशातील छोटे व्यापारी, मजूर, कामगार, गरिबांना आर्थिक मदत, कर्जाची घोषणा केली होती.
30 जून - सहाव्या संबोधनात पंतप्रधान मोदी काय बोलणार?
पंतप्रधानांची आठची वेळ खरंतर पंतप्रधान मोदींनी यापूर्वी बहुतांश वेळा रात्री आठची वेळ साधत देशाला संबोधित केलं आहे. नोटाबंदी, जनता कर्फ्यू तसंच लॉकडाऊनसह अनेक महत्त्वाच्या घोषणांसाठी पंतप्रधानांनी रात्री आठची वेळ निवडलेली दिसते. पण काही वेळा मोदींनी सकाळी किंवा दुपारी देशाला संबोधित केलं आहे.
नोटाबंदीनंतर धसका 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख कोणताही भारतीय सहजासहज विसरणं शक्य नाही. कारण याच दिवशी पंतप्रधान मोदींनी रात्री आठ वाजता देशाला उद्देशून भाषण केलं आणि नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान रात्री आठ वाजता देशाला उद्देशून भाषण करणार असं म्हटलं तरी आजही अनेकांची धाकधूक वाढते. मोदी काय बोलणार याचीच चर्चा गावातल्या पारापासून सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळते.
मोदींचं संबोधन आणि सोशल मीडियावर मीम्स पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार म्हटलं की तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. यावरुन मीम्स तयार होतात आणि तुफान व्हायरलही होतात. मोदींनी भाषणाची सुरुवात 'मित्रों' या शब्दाने केली तर धोका नाही आणि 'मेरे प्यारे देशवासियों' म्हटलं तर मोदी कोणतीतरी घोषणा करणार, असा दावा या मीम्समधून केला जातो. यासाठी नेटकरी नोटाबंदीच्या भाषणाचा दाखला देतात.
पंतप्रधान मोदींचे आतापर्यंतचे संबोधन
1. 8 नोव्हेंबर 2016 (नोटाबंदीची घोषणा) - काळ्या पैशांवर लगाम लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केलं आणि नोटाबंदीची घोषणा केली. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याचं त्यांनी जाहीर केलं.
2. 15 फेब्रुवारी, 2019 (पुलवामा हल्ल्यानंतर) - पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांच्या कॅम्पवरील हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं होतं. या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.
3. 27 मार्च, 2019 (मिशन शक्ती) - मोदींनी 27 मार्च रोजी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात सांगितलं होतं की, डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये एक लाईव सॅटेलाईट पाडलं.
4. 8 ऑगस्त 2019 (कलम 370 हटवल्यानंतर) - जम्मू-काश्मीरसाठीचं कलम 370 हटवल्यानंतर मोदींनी 8 ऑगस्त 2019 रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केलं होतं.
5. 7 सप्टेंबर 2019 - चंद्रयान-2 चंद्रावर उतरण्याआधीच त्याच्याशी संपर्क तुटल्यानंतर त्यांनी वैज्ञानिकांचं मनोधैर्य खचू नये यासाठी संबोधन केलं होतं.
6. 9 नोव्हेंबर 2019 - पंतप्रधानांनी अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आणि पंजाबमध्ये करतारपूर कॉरिडोरबाबत भाष्य केलं होतं.
7. 19 मार्च, 2020 (जनता कर्फ्यू का आव्हान) - देशात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारी प्रयत्नांसोबत नागरिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं.
8. 24 मार्च, 2020 (लॉकडाऊनची घोषणा) - पंतप्रधान मोदींनी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी देशवासियांकडे काही वेळ मागितला होता. त्यांनी संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती.
9. 3 एप्रिल 2020 (नऊ मिनिट मागितली) - पंतप्रधान मोदींनी 5 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करुन बाल्कनी किंवा दारात दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं.
10. 14 एप्रिल 2020 (लॉकडाऊन वाढवला) - पंतप्रधान मोदींनी देशभरात लागू असलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा 14 एप्रिल रोजी केली होती.