PM Narendra Modi Speech | राज्यांनी लॉकडाऊनचा अंतिम पर्याय म्हणून वापर करावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असायला हवा. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये. 'दवाई भी कडाई भी' याचं पालन सर्वांनी केलं पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटात संयम कायम राखला पाहिजे. नागरिकांनी नियम पाळून देशाला लॉकडाऊनपासून वाचवलं पाहिजे. राज्यांनी देखील लॉकडाऊनचा शेवटचा पर्याय म्हणून वापर करावा. तसेच राज्यांनी मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
देशात अनेक राज्यांनी निर्बंध कडक केले आहे, तर काही राज्यांनी वीकेंड लॉकडाऊन लागू केलं आहे. देशातील विविध राज्यांच्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असायला हवा. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये. कोरोना संकटात नागरिकांचे जीव वाचले पाहिजेत. मात्र देशाचं अर्थचक्रही सुरु राहिलं पाहिजे. त्यामुळे 'दवाई भी कडाई भी' याचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. तरुणांना या संकटाना पुढे येऊन मदत केली पाहिजे.
गेल्यावर्षी कोरोनाची लाट आली त्यावेळी स्थिती याही पेक्षा बिकट होती. पहिल्या लाटेत आपल्याकडे कोरोनाविरुद्धची लढण्यासाठी पुरेशा आरोग्य सुविधा नव्हत्या. मात्र आता आपल्याकडे लस आहे, पीपीई किट, मास्क, कोरोना टेस्टिंगची सुविधा आहे. आरोग्य यंत्रणेनं खुप मोठं काम केलं आहे, अनेकांचे प्राण वाचवले आहेत, असं मोदी यांनी म्हटलं.
जगातील सर्वात स्वस्त लस भारताकडे- मोदी
भारताकडे आज दोन मेड इन इंडिया लस आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती केली जात आहे. तसेच जगातील सर्वात स्वस्त लस भारतात आहे. त्यामुळेच भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. जगभरात सर्वात वेगवान लसीकरण भारतात होते आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार आहे. तरुण आज कामानिमित्त बाहेर फिरत आहेत. त्यांचं लसीकरण महत्त्वाचं आहे.
प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळावं यासाठी प्रयत्नशील- मोदी
देशात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांचे सर्वांचे प्रत्येकाला ऑक्सिजन पुरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यांमध्ये नवे ऑक्सिजन प्लांट सुरु केले जात आहेत. औद्योगिक वापरासाठीच्या ऑक्सिजनचा वापर मेडिकल सुविधेसाठी वापरला जात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
कामगारांनी आहे तिथेच राहावं- मोदी
कामगारांचंही मोठ्या प्रमाणात लसीकरण होणार आहे. राज्य सरकारांनी कामगारांना विश्वास द्यावा. स्थलांतर करणाऱ्या कामगारांना तिथेच रहावं, असं आवाहन राज्य सरकारांनी कामगारांना केलं पाहिजे. कामगारांनी जिथे आहात तिथेच राहावं जेणेकरुन त्यांचं कामही सुरु राहील आणि लसीकरणही होईल, असं मोदी यांनी म्हटलं.