नारायण राणे, भारती पवार, स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांचा पत्ता कट; जुन्या कॅबिनेटमधील 20 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही
PM Modi Cabinet : स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांच्यासह जुन्या कॅबिनेटमधील 20 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही. काही हरलेले तर काही जिंकलेल्यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान (Prime Minister) म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर नेतेही मंत्रिपदाची शपथ (PM Modi Cabinet) घेतील. यंदा मोदी 3.0 सरकारमध्ये कोणत्या चेहऱ्यांचा समावेश होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्यासोबत 65 नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, असं असताना जुन्या मोदी कॅबिनेटमधील काही मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे. स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांच्यासह जुन्या कॅबिनेटमधील 20 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही. काही हरलेले तर काही जिंकलेल्यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे.
या नेत्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात स्मृती ईराणी, राजीव चंद्रशेखर यासह अनेक नेत्यांना महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याशिवाय अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रीडा मंत्रालय होते. दरम्यान, आता मोदी 3.0 मध्ये एकूण 20 नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये हे नेते सहभागी झाले नव्हते. यावरून त्यांचा यावेळी मोदी मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही?
स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्हीके सिंह आणि अश्विनी चौबे या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही. तसेच अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आरके सिंह, अर्जुन मुंडा, निशीथ प्रामाणिक, सुभाष सरकार, जॉन बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे आणि भागवत कराड यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश नसेल, अशी माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

