Independence Day 2022 : जाणून घ्या आगामी 25 वर्षांसाठी पंतप्रधानांनी सांगितलेली 'पंचप्रण'
PM Narendra Modi Speech : आगामी 25 वर्षांसाठी पंतप्रधानांनी 'पंचप्रण' (Panch Pran) कार्यक्रम देखील देशासमोर ठेवला आहे. येत्या काळात आपण 'पंचप्रण'वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Independence Day 2022 PM Narendra Modi Speech : आज संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिनाचं उत्साह (Independence Day) पाहायला मिळत आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन अधिक खास आहे कारण आपण स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरुन (Red Fort) नवव्यांदा ध्वजारोहण केलं. यावेळी त्यांना 21 तोफांची सलामीही देण्यात आली. यावेळी लाल किल्ल्याभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी 25 वर्षे आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. कारण भारत स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. म्हणूनच येणाऱ्या 25 वर्षात देशाची हरतऱ्हेने प्रगती कशी होईल याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा आणि जनतेची साथ मिळायला हवी, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आगामी 25 वर्षांसाठी पंतप्रधानांनी 'पंचप्रण' (Panch Pran) कार्यक्रम देखील देशासमोर ठेवला आहे. येत्या काळात आपण 'पंचप्रण'वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हे 'पंचप्रण' खालीलप्रमाणे आहेत.
1. विकसित भारत : पहिलं प्रण म्हणजे विकसित भारताचं. आता देश एक मोठा संकल्प घेऊन चालेल आणि तो मोठा संकल्प विकसित भारताचा आहे.
2. गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका - दुसरं प्रण म्हणजे आपल्या मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात गुलामगिरीचा एकही अंश राहू देऊ नका. या गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाका.
3. आपल्या वारशाचा अभिमान बाळगा - तिसरे प्रण म्हणजे आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. हाच वारसा आहे, ज्याने भारताला सुवर्णकाळ दिला. याच वारशामध्ये वेळोवेळी परिवर्तन करण्याची ताकद आहे.
4. एकतेचं सामर्थ्य - चौथं प्रण म्हणजे एकता आणि एकजुटता. 130 कोटी देशवासियांमध्ये एकता असावी, आपला आणि परका असा भेद नसावा. एक भारत आणि श्रेष्ठ भारताची ही प्रतिज्ञा आहे.
5. नागरिकांची कर्तव्ये : पाचवं प्रण हे नागरिकांचे कर्तव्य आहे. यात पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचाही समावेश आहे. 25 वर्षांचे संकल्प पूर्ण करण्याचं आमचं हे व्रत आहेत.