PM Modi : 75 हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे सुपूर्द, दिवाळीनिमित्त PM मोदींची तरुणांना भेट!
PM Modi Launch Rozgar Mela : केंद्र सरकारच्या 10 लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याला शुभारंभ करण्यात आला. यावेळी 75 हजार युवकांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या 10 लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याला शुभारंभ करण्यात आला. यावेळी 75 हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या रोजगार मेळाव्याअंतर्गत, देशभरातील निवडक तरुणांची नियुक्ती भारत सरकारच्या 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये केली जाईल. नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारमध्ये विविध स्तरावर सहभागी करून घेतले जाणार आहे.
रोजगार मोहिमेतील आणखी एक दुवा : पंतप्रधान मोदी
रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरू आहे, आज त्यात आणखी एक दुवा जोडला जात आहे. आज केंद्र सरकार 75 हजार तरुणांना नियुक्ती पत्र देत आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वावलंबी भारताच्या वाटेवर चालत आहोत. यामध्ये आमचे नवोदित उद्योजक, शेतकरी, सेवा आणि उत्पादक सहकारी यांचा मोठा वाटा आहे. आज केंद्र सरकारचे अनेक विभाग यात आहेत. त्यामागे 7-8 वर्षांची मेहनत आहे, कर्मचाऱ्यांचा दृढ संकल्प आहे.
येत्या 18 महिन्यात रिक्त पदे भरणार
या मोहिमेअंतर्गत येत्या 18 महिन्यात ही सर्व रिक्त पदे सरकार भरणार आहे. केंद्राचे सर्व विभाग यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सर्व मंत्रालये आणि विभागांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले होते. रोजगार मेळाव्याअंतर्गत, भारत सरकारच्या 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये देशभरातील निवडक तरुणांची नियुक्ती केली जाईल. नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारमध्ये विविध पातळ्यांवर सहभागी करून घेतले जाणार आहे.
भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सात-आठ वर्षात आम्ही १० नंबरवरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हे शक्य होत आहे कारण गेल्या 8 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेतील ज्या उणिवांमुळे अडथळे निर्माण होत होते, त्या उणिवा आम्ही दूर केल्या आहेत.
तरुणांच्या कौशल्य विकासावर सर्वाधिक भर
तरुणांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आमचा सर्वाधिक भर तरुणांच्या कौशल्य विकासावर आहे. ते म्हणाले की, 'प्रधानमंत्री कौशल विकास योजने'अंतर्गत तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी देशात मोठी मोहीम सुरू आहे. मोदी म्हणाले, कौशल्य विकास योजनेअंतर्गत देशातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे. या अंतर्गत, स्किल इंडिया मोहिमेच्या मदतीने आतापर्यंत 1.25 कोटीहून अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या वर्षांत खादी आणि ग्रामोद्योगात एक कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यातही आमच्या भगिनींचा मोठा वाटा आहे.