Vande Bharat: देशाला मिळाली आठवी वंदे भारत ट्रेन, पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
Vande Bharat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिकंदराबाद आणि विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला आहे.
PM Narendra Modi Vande Bharat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिकंदराबाद आणि विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला आहे. ही देशातील आठवी वंदे भारत ट्रेन आहे. शनिवारपासून तिकिट विक्रीला सुरुवात झाली असून सोमवार 16 जानेवारीपासून नियमीत सेवा सुरु होणार आहे.
या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी आणि तेलंगाणाचे राज्यपाल टी सौंदर्यराजन सिकंदराबाद स्टेशनवर उपस्थित होते. आठव्या वंदे भारत ट्रेनमध्ये 14 एसी चेअर कार आणि दोन एक्जीक्यूटिव एसी चेयर बोगी असतील. या ट्रेनमधून 1,128 प्रवाशी प्रवास करु शकतात, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मकर संक्राती आणि पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा वारसा जोडण्याचं काम वंदे भारत ट्रेन करेल. त्याशिवाय आपला विश्वास जोडण्याचं कामही करेल. या ट्रेनमुळे पर्यटनाला आणखी चालना मिळेल, त्याशिवाय देवदर्शन आणखी सुलभ होणार आहे. ही ट्रेन नव्या भारताच्या संकल्पाचं प्रतिक आहे.
भारतीय रेल्वेकडून सेवेत दाखल होणारी ही आठवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली गाडी असून सुमारे 700 किमी अंतर पार करणार आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तर तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबवेल. स्वदेशात निर्मिती करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना जलद, आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणारी आहे..
Transforming Indian Railways. pic.twitter.com/znnppvIDVs
— PMO India (@PMOIndia) January 15, 2023
वंदे भारत ट्रेन कसा करेल प्रवास?
रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम- सिकंदराबाद एक्स्प्रेस (20833) सकाळी पाच वाजून 15 मिनिटांनी विशाखापट्टणम स्टेशनवरुन रवाना होईल... दुपारी दोन वाजून 15 मिनिटांनी सिकंदराबाद येथे पोहचले. तर सिकंदराबाद - विशाखापट्टणम- एक्स्प्रेस (20834) तीन वाजता सिकंदराबाद स्थानकातून रवाना होईल आणि रात्री साडेअकरा वाजता विशाखापट्टणम येथे पोहचेल. 14 एसी चेअर कार आणि दोन एक्जीक्यूटिव एसी चेयर बोगी असतील. या ट्रेनमधून 1,128 प्रवाशी प्रवास करु शकतात.